Mahayuti Seat Sharing : विधानसभेच्या आणखी 10 जागांसाठी अजितदादांचा शाहांच्या मागे तगादा
महायुतीत राष्ट्रवादीला हव्या विधानसभेच्या आणखी १० जागा... जास्तीच्या १० जागांसाठी अजितदादांचा शाहांच्या मागे तगादा... काल आणि आज तटकरे, पटेलांनी घेतली अमित शाहांची भेट... भाजप, शिवसेना जास्त जागा देणार नसल्याची दादांना शंका... विधानसभेत लढण्यासाठी राष्ट्रवादीचा जास्त जागांसाठी आग्रह...
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषत: विदर्भात जबर दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी (State Legislative Assembly Election 2024) चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत. दरम्यान, अमित शाह (Amit Shah) यांनी भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर आगामी निवडणुकांसाठीचे आपले प्रमुख उद्दिष्ट सांगत पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, यावेळी महायुतीच्या जागावाटापाबाबत अमित शाह (Amit Shah) यांच्या सोबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. अशातच आता महायुतीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अमित शाहांच्यादौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जागावाटपचा विषय चंगालाच लावून धरला असल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास 10 जागा आणखी मिळाव्यात, ही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
गृहमंत्री अमित शाहांसोबत अजित पवारांची वेगळी फिल्डिंग?
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)हे काल (मंगळवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यानिमित्य मुंबईत येऊन गेलेत. त्यांच्या या मुंबई दौऱ्यादरम्यान विमानतळापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या मागे होते. काल विमानतळावर अमित शाहांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel)आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) भेटले. त्यानंतर रात्री फक्त दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या बराच वेळ चर्चा झाली. त्यांनतर आज पुन्हा सकाळी भाजप,राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले आणि आज अमित शाह माघारी गेल्यानंतर परत विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार,सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान, भेटींचे हे सत्र लक्षात घेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हे माहिती आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना आणि भाजप त्यांना जास्त जागा देणार नाही. म्हणून अमित शाहांकडे अजित पवार फिल्डिंग लावत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी यावेळी भेटणे टाळलं असावं, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.