Haryana Election Result : हरियाणात भाजपच्या आघाडीचं कारण काय? महाराष्ट्रात काय होईल?
Haryana Vidhan Sabha Election
नवी दिल्ली: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी पार पडत असलेल्या मतमोजणीत अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पार 'झोपलेला' भाजप आता बहुमताच्या जवळ येऊन पोहोचला आहे. त्यामुळे हरियाणात (Haryana Elections Results 2024) भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना काँग्रेस पक्षाचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) मतमोजणीची ताजी आकडेवारी अपडेट करत नसल्यामुळेच भाजप (BJP) सध्या आघाडीवर दिसत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असे जयराम रमेश यांनी म्हटले.
आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आम्ही आता त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवले जात आहेत. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत आहे. हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी हाच प्रकार घडला होता. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे. स्थानिक यंत्रणांवर निवडणूक आयोगाने दबाव आणणे योग्य नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबून राहावे. खेळ अजून संपलेला नाही. भाजप मनोवैज्ञानिक खेळ खेळत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले.