Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
मुंबई : निवडणुका आल्यावर ठाकरेंना मराठी माणूस आठवतो, यांचा मराठीचा पुळका खोटा असून यांना फक्त मुंबईच्या तिजोरीचा पुळका आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई धोक्यात नाही तर ठाकरेंचं राजकारण धोक्यात आहे, 16 तारखेनंतर यांचा बँड वाजणार असंही शिंदे म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचारसभेचा शुभारंभ झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली.
आपण अनेक विकास काम करत आहोत. मराठी माणसांना चांगली घरं दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या काळात स्पीड ब्रेकर आणि ब्रोकरचं चालत असायचं. आम्ही ते सगळं हटवून टाकलं असं एकनाथ शिंदे म्हणाले. 20 वर्षापूर्वी कुणासाठी वेगळे झाला होता? आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण झाली असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
Eknath Shinde On Thackeray Brothers : मुंबईला लुटण्याचं काम केलं
ठाकरे बंधूंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "काल कोणीतरी व्हिजन डॉक्युमेंट्स दाखवले. इतके वर्षे सत्तेत होता तेव्हा कुठे गेलं होतं व्हिजन? यांनी मुंबईला फक्त लुटण्याचं काम केलं आहे. आजची ही सभा आहे ती मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली ललकारी आहे. भ्रष्टाचाराच्या मगरमिठीतून मुंबई आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई सोडवायची आहे."
आम्ही दोघांनी मिळून मुंबईसाठी जे निर्णय घेतले ते तुम्हाला माहीत आहेत. आमच्या काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. तुम्ही काय केलं? तुमचा मराठीसाठीचा पुळका खोटा आहे.
तुम्हाला पुळका फक्त मुंबई पालिकेच्या तिजोरीचा आहे. अंडी खाऊन झाली, पण आता कोंबडी कापायला निघाले अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी टीका केली.