RBI Monetary Policy | कोरोना संकटातून अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली : गव्हर्नर शक्तिकांत दास
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. मॉनेटरी पॉलिसी कमिटीनं रेपो रेट 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवरच ठेवला आहे. रेपो रेटमध्ये कुठलाही बदल न केल्यानं हे स्पष्ट झालं आहे की, इएमआय आणि लोनवरील व्याजांवर कुठलाही दिलासा मिळणार नाही. रेपो रेटमध्ये काही बदल होईल याबाबत पहिल्यापासून कमी आशा होती. ऑगस्ट महिन्यात देखील पॉलिसी रेट मध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र त्याआधी फेब्रुवारीमध्ये रेपो रेटमध्ये 2.50 टक्के कपात करण्यात आली होती.
कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. आरबीआयच्या पतधोरणानंतर शेअर बाजार वधारला आहे. आजपासून आरटीजीएस 24 तास सुरु राहणार असल्याची देखील माहिती आहे.
खाद्यान्न उत्पादनात नवे रेकॉर्ड होण्याची शक्यता
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी मौद्रिक धोरण समिति (एमपीसी) च्या बैठकीत घोषणा करत म्हटलं की, एमपीसीने रेपो रेटला चार टक्क्यांवरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शक्तिकांत दास म्हणाले की, खाद्यान्न उत्पादनात देशात एक नवा विक्रम होऊ शकतो. मान्सून चांगला राहिला असल्याने आणि खरीपाचं पीक चांगलं आल्यानं खाद्यान्न उत्पादनात नवीन विक्रम बनू शकतो.
ते म्हणाले की, आरबीआयकडून आर्थिक वृद्धीसाठी उदार धोरण अवलंबलं आहे. कोरोना व्हायरस विरोधातील लढाईमध्ये भारतीय अर्थव्यवस्था निर्णायक टप्प्यात आहे. अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्या तिमाहीत आलेली घट मागे पडली आहे. या स्थितीमध्ये सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. अंकुश लावण्यापेक्षा आता अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चालू वित्तिय वर्षात चौथ्या तिमाहीपर्यंत महागाई देखील आटोक्यात येण्याची चिन्हं आहेत, असं देखील दास यांनी म्हटलं आहे.