Sanjay Raut Vs Narayan Rane : "केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासारखे आम्ही पळपुटे नाही. ईडीची नोटीस (ED Notice) येते म्हणून पळून जाणारे आम्ही नाही. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरणं काढली तर ते 50 वर्षे सुटणार नाहीत," असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. "संजय राऊत याला पुन्हा जेलचा (Jail) रस्ता दाखवणार. 100 दिवस जेलमध्ये जाऊन बाहेर आलाय ना. त्याला पुन्हा जेलवारी घडवणार," असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे दिला होता. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं. 


राजवस्त्र बाजूला काढा आणि या


"मी नारायण राणेंवर अजून काहीच बोललो नाही. जर तुम्ही धमक्या देणार असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या. झाकली मूठ सव्वा लाखाची, माझ्या नादाला लागू नका. मी हिंमतीने पक्षासाठी जेलमध्ये गेलेलो आहे. तुमच्या हातात न्यायालय, कायदा आहे का? मला जेलमध्ये कसे घालणार," असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. 


.. तर नारायण राणे 50 वर्षे सुटणार नाहीत


"मला जेलमध्ये कोण कोण घालणार आणि काय काय बोलत आहे तुम्ही याची सगळी नोंद चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना पाठवले आहे. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरणं काढली तर ते 50 वर्षे सुटणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला.  


नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी  (Nashik Shiv Sena)


दरम्यान, आज नाशिकमधील ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. याबाबत संजय राऊत म्हणाले, "नाशिकचे कोण पदाधिकारी आहेत मला माहित नाही. नाशिकमधल्या लोकांनादेखील पदाधिकारी माहित नाही.  येडेगबाळे असे कोणीही पकडतात आणि पदाधिकारी दाखवून त्यांच्या पक्षात प्रवेश करुन घेत आहेत." "नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे," असा दावा संजय राऊत यांनी केला. 


योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आम्हाला प्रेम (Sanjay Raut on Yogi Aadityanath) 


"योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे आदर आहे. मुंबईत जाऊन जर त्यांनी त्यांच्या राज्यासाठी विकासाचं मॉडेल घेऊन जात असेल तर त्यात काही हरकत नाही. मुंबई अनेक राज्यांचं पोट भरत आहे," असं संजय राऊत म्हणाले. 


बदल घडवण्याची धमक पत्रकारांमध्ये


"मी माझ्या आयुष्याची सुरुवात पत्रकार म्हणून केली, राजकारणात अनेक पदावर राहिलो, तरी मी जगतो पत्रकार म्हणून. समाजात बदल घडवण्याची धमक पत्रकारांमध्ये आहे," असं संजय राऊत म्हणाले.


VIDEO : Sanjay Raut on Narayan Rane : ईडीची नोटीस आल्यावर पक्ष बदलणारे डरपोक आम्ही नाही - संजय राऊत



संबंधित बातमी


Sindhudurg News : 26 डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं, संजय राऊतांना पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी रस्ता मोकळा करतोय : नारायण राणे