मुंबई : पाण्यावरुन नाशिक आणि मराठवाडा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण नाशिक जिल्ह्यातील पाण्याच्या एका थेंबालाही हात लावून देणार नाही, असा इशारा नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिलाय. नाशिकच्या मुकणे धरणातील पिण्याच्या पाण्याचं आरक्षण रद्द करण्याचं वक्तव्य राजशे टोपेंनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आमदार फरांदे यांनी हा इशारा दिलाय.


पाण्यावरून नाशिक जिल्हा आणि मराठवाडा यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मंत्री राजेश टोपेंसह मराठवाड्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना आव्हान दिलंय. नाशिकच्या पिण्याच्या एक थेंब पाण्याला धक्का लावू देणार नाही, असा इशारा आमदारांनी दिलाय. नाशिकच्या पिण्याच्या पाण्याला धक्का लावण्यापेक्षा जायकवाडी धरणातून अवैधरित्या होणारा पाणी उपसा थांबवावा, असं आव्हान त्यांनी दिलंय. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिल असून गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत पाणी उपसा होत असल्यान त्यांच्यावर कारवाईची मागणी केलीय.

मराठवाडा पाणीप्रश्न : औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत गोंधळ

नाशिक शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुकणे धरण बांधण्यात आलंय. त्यावर 260 कोटी रुपये खर्च करून जलशुद्धिकरण केंद्र आणि वितरण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आलीय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असा इशारा फरांदे यांनी दिलाय.

मराठवाड्यातला पाणीप्रश्न गंभीर -
मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळवाडा, टँकरवाडा अशी विशेषणे लागली आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न प्रचार केला गेला. महाविकास आघाडी सरकारनं मराठवाड्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून मराठवाडा वॉटरग्रीडची योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली. पण या योजनेला देखील महाविकास आघाडी कात्री लावण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, मराठवाड्याचा पाणीप्रश्नी औरंगाबाद इथल्या हॉटेल अजिंठा आंबे सिटरमध्ये आमदारांची बैठक बोलवली होती. मराठवाड्यातल्या 55 आमदारांपैकी या बैठकीला केवळ 10 आमदार उपस्थित होते. यातील नऊ आमदार भाजपचे तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. तर काही वेळातच संजय शिरसाठ यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यामुळेच या बैठकीत विद्यार्थ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त महिला आणि मुलांनी आमदारांना धारेवर धरलं. केवळ आमदरच नाही, तर मराठवाड्यातल्या 9 खासदारांपैकी एकही खासदार उपस्थित नव्हता.

Marathwada Water Issue | औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत गोंधळ | ABP Majha