चंद्रपूर शहरातील मानवी तस्करीचे एक खळबळजनक प्रकरण उजेडात आले असून रामनगर पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण उघडकीस आल्याने अल्पवयीन मुलींच्या तस्करीचे एक मोठे रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यात उजेडात येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील फतेहाबाद येथे काही दिवसांपूर्वी घरात डांबून ठेवलेल्या एका महिलेची स्वयंसेवी संस्थांनी पोलिसांच्या मदतीने सुटका केली होती. धर्मवीर नावाच्या व्यक्तीने तिला एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवले होते. मात्र, घर मालकाला या मुलीच्या वर्तनाचा संशय आल्याने त्याने विचारपूस करताच खरा प्रकार उजेडात आला. या घरमालकाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना याची माहिती देत मुलीची सुटका करवली. दरम्यान हरीयाणा पोलिसांनी यासंबंधीचा मूळ गुन्हा शोधून काढला आणि या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली.
'ती' 20 वर्षानंतर शहरात परतली -
सुटका करण्यात आलेली मुलगी मूळची चंद्रपूर शहरातील आहे. चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या बंगाली कॅम्प परिसरात असलेल्या एका मंदिराच्या प्रांगणातून 2010 साली अकरा वर्षाच्या या मुलीचे आरोपींनी प्रसादातून गुंगीचे औषध देत अलगद अपहरण केले. या मुलीला तातडीने हरियाणा राज्यातील पानीपत येथे नेत तिची विक्री केली गेली. शेतावरील एका घरात तिला डांबून ठेवण्यात आले. खरेदी केलेल्या व्यक्तीच्या मुलांनी या कोवळ्या जीवावर सतत अत्याचार केले. अजाणत्या वयात या मुलीचा तब्बल सातवेळा सौदा झाला. तर अत्याचाराच्या परिसीमेने मुलगी दोन मुलांची आई देखील झाली. विक्रीच्या निमित्ताने तिला हरियाणातील विविध शहरात ठेवले गेले. हे प्रकरण सातत्याने सुरू असताना हरियाणा राज्यातीलच फतेहाबाद येथे सातव्यांदा तिला धर्मवीर नावाच्या व्यक्तीला विकण्यात आले. मात्र, घरमालकाच्या समयसूचकतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. चंद्रपूरच्या रामनगर पोलिसात हा गुन्हा दाखल असल्याने रामनगर पोलिसांच्या पथकाने फतेहाबाद गाठून या मुलीला चंद्रपुरात परत आणले आहे. रामनगर पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी जान्हवी आणि सपना या दोन महिलांना अटक केली असून या मागे रॅकेट मोठे असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Aurangabad | शिर्डीत मानवी तस्करी, अवयवांचा व्यापार होतो का?; औरंगाबाद खंडपीठाचा प्रशासनाला सवाल | ABP Majha