Ganeshotsav Mumbai Traffic Updates : सध्या देशासह संपूर्ण राज्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) जल्लोषात साजरा केला जात आहे. अशातच मुंबईत गणेशोत्सनानिमित्त भाविक गणेश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज आणि उद्या मुंबई (Mumbai) दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे मुंबईती काही प्रमुख वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले असून काही भागांतील वाहतूक संथगतीनं सुरु राहणार असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. तसेच, काही प्रमुख नेत्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठीही ते उपस्थिती लावणार आहेत. तसेच शहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार असल्याची माहिती मिळत आहे. 


मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अतिमहत्वाची व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान 4 आणि 5 सप्टेंबर, 2022 रोजी काही भागांतील रस्त्यांवरील वाहतूक संथ राहील, अशी माहिती मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून देण्यात आली आहे. 


लालबागमध्येही वाहतूक संथ गतीनं 


अमित शाह आपल्या मुंबई दौऱ्यात लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. त्यामुळे लालबागमध्येही वाहतूक संथ गतीनं होणार आहे. त्यासोबतच गणेशोत्सवादरम्यान, लालबागमध्ये गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ लागलेली असते. अशातच तेथील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, लालबागमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी आणि व्हिव्हिआयपी (VVIP) उपस्थिती लावतात. त्यामुळे बऱ्याचदा या मार्गांमध्ये आणखी काही बदल केले जातात. तसेच, या भागांतील वाहतूक संथ राहणार असल्याचं वाहतूक पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 


उद्या म्हणजेच, सोमवारी 5 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागातील रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने होईल, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. 


कधी आणि कुठे होणार वाहतूकीवर परिणाम? 



  • रविवारी 4 सप्टेंबर रोजी सहार, वांद्रे, वरळी सी लिंक, हाजीअली, केम्स कॉर्नर, बाबुलनाथ आणि मलबार हिल परिसरात वाहतूक संथ होणार आहे. 

  • सोमवार, 5 सप्टेंबर रोजी मलबार हिल, बाबुलनाथ, केम्स कॉर्नर, हाजीअली, महालक्ष्मी रेस कोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन आणि लालबाग परळ, लोटस जंक्शन, वरळी डेअरी, सी लिंक, लिलावती जंक्शन परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु असणार आहे. तसेच, मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरिन लाईन्स आणि रिगल जंक्शन कुलाबा परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु राहिल. त्याचप्रमाणे मरोळ ते पवई दरम्यानच्या परिसरातही वाहतूक संथ होणार आहे. 


दरम्यान, लालबागमध्ये होणारी गणेश भाविकांची गर्दी लक्षात घेता. तेथील वाहतूकही पर्यायी मार्गांवरुन वळवण्यात आल्याचं वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दादर, माहीम, सायन, माटुंगा, परळ, लालबाग, भायखळा येथील काही ठिकाणांवरील वाहतूक पर्यायी ठिकाणांवरुन वळवण्यात आली आहे.