Raj Thackeray MNS : जुने भिडू, जबाबदारीचा नवीन ट्रॅक; कशी आहे मनसेची नवीन यंत्रणा? Special Report
मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्षसंघटनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात मनसेची बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानुसार फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत (MNS) आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माईणकर आणि मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आली आहे. तर अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले आहे. ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
केंद्रीय समिती ही सर्व विभाग अध्यक्षांवर लक्ष ठेवेल. बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांच्याकडे मनसेच्या केंद्रीय समितीची विशेष जबाबदारी असेल. मुंबईच्या विभाग अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर विशेष जबाबदारी असेल.