स्थानिकांपूर्वी बाहेरच्यांना लस कशी मिळते? कर्जतमध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा संघर्ष होणार?
रश्मी पुराणिक, एबीपी माझा | 07 May 2021 10:49 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये अलिबाग, पनवेल, पेण , कर्जत, खालापूर हे हॉटस्पॉट बनू लागले आहेत. यामुळे, अनेक रहिवासी ही लसीकरण करण्यासाठी हे नजीकच्या केंद्रांवर गर्दी करीत आहेत. दरम्यान, ऑनलाइन रजिस्ट्रेशनमुळे अनेक व्यक्ती या तालुका व्यतिरिक्त नजीकच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेत आहेत. यामुळे, कर्जत तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर बदलापूर, कल्याण येथील रहिवासी देखील लसीकरण करण्यासाठी हजेरी लावत आहेत. तर, इतर तालुक्यातील रहिवासी हे लसीकरण करण्यासाठी येत असल्याने स्थानिकांचे लसीकरण होत नसल्याचे तक्रार कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.