Alleged Property | ठाकरे नेत्याच्या ८ फ्लॅट, हॉटेलचा गौप्यस्फोट, दुबे यांचा सवाल
abp majha web team | 08 Jul 2025 10:46 PM (IST)
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या एका नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. दुबे यांनी एका पोस्टद्वारे या नेत्याच्या मालमत्तेची सविस्तर माहिती सार्वजनिक केली आहे. यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात असलेल्या आठ फ्लॅटचा समावेश आहे. तसेच, नालासोपाऱ्यात एक हॉटेल आणि कोकणामध्ये एका बंगल्याचाही उल्लेख आहे. दुबे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांताक्रूझमधील तीन बेडरूमचा फ्लॅट, बांद्रा पश्चिम येथील चार बेडरूमचा फ्लॅट, मुंबईलगतच्या नालासोपारा येथील चार फ्लॅट, विरारच्या एअर इंडिया कॉलनीमधील एक फ्लॅट, बोरिवलीच्या काजूपाडा येथील एक दुकान आणि नालासोपाऱ्यातील कोकण नावाचे रेस्टॉरंट यांचा तपशील दिला आहे. याशिवाय, कोकणातील केळवे येथील रहिवासी मालमत्तेचाही यात समावेश आहे. दुबे यांनी या सर्व मालमत्तांचा उल्लेख करत, 'ठाकरेंचे नेते एवढा पैसा आणतात कुठून?' असा थेट सवाल विचारला आहे. त्यांच्या पोस्टमध्ये 'शिवसेना ठाकरे पक्षाच्या एका नेत्याच्या भ्रष्टाचाराची कहाणी' असे शीर्षक दिले आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.