MNS Marathi FIR Protest | युनियन बँकेचा आडमुठेपणा, अखेर मराठी FIR स्वीकारला!
abp majha web team | 16 Jul 2025 02:50 PM (IST)
एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर, युनियन बँकेच्या आडमुठेपणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार आंदोलन केले. योगेश बोपचे यांच्या अपघाती मृत्यूनंतर विमा प्रकरणात मराठीतील एफआयआर (FIR) नाकारणाऱ्या बँकेबाहेर मनसेने निदर्शने केली. आंदोलकांनी बँकेच्या बोर्डाला काळं फासले आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर मनसे शिष्टमंडळाने पोलिसांच्या समक्ष बँक अधिकाऱ्यांना जाब विचारला. बँकेने मराठी एफआयआर स्वीकारण्यास नकार दिल्याने बोपचे कुटुंबियांना विमा दावा मिळण्यास विलंब होत होता. यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विमा कंपन्यांना स्थानिक भाषेतील कागदपत्रे चालणार नाहीत असे म्हटले होते. मात्र, मनसेच्या आंदोलनानंतर आणि जाब विचारल्यानंतर बँकेने आपली भूमिका बदलली. अखेर, बँकेने बोपचे कुटुंबियांचा अर्ज स्वीकारणार असल्याचे सांगितले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी "आम्ही त्यांचा अर्ज आताही स्वीकारायला तयार आहोत" असे स्पष्ट केले. या घटनेमुळे बँकिंग व्यवहारात मराठी भाषेच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोपचे कुटुंब सध्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे बाहेरगावी असल्याने, ते परत आल्यावर बँकेत बोलावून त्यांचा अर्ज स्वीकारला जाईल असे बँकेने नमूद केले.