OBC Reservation 'ओबीसींच्या कोट्याला हात लावल्यास शांत बसणार नाही' विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2020 05:48 PM (IST)
जालना : मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नसल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार जालना दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाला धक्का लागेल, अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटत आहे. आम्ही पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाबरोबर आहोत. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं आहे. जर असा प्रयत्न झालाच तर मंत्री पद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं विजय वडट्टीवार यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी समाजाचे पहिले मराठवाडास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती.