iPhone Spyware Alert : काही महिन्यांपूर्वी पेगाससकडून (Pegasus) हेरगिरीचे प्रकरण भारतात गाजले होते, त्यामुळे संसदेपासून ते राजकीय पक्षांमध्ये बरीच चर्चाही झाली होती. नेमके हेच प्रकरण आता आयफोनच्या (iPhone) बाबतीत समोर येत आहे, आयफोनमध्ये पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअर (iPhone Spyware Software) बसवले जात असल्याचा दावा केला जात आहे, जे यूजर्सची हेरगिरी करत आहे.
नवीन सुरक्षा अपडेट जारी
तुमच्याकडेही अॅपलचे आयफोन, आयपॅड, मॅक कॉम्प्युटर आणि स्मार्टवॉच असतील तर तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण, जगातील सर्वात धोकादायक हेरगिरी स्पायवेअर पेगासस तुमच्या अॅपल डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल केले जाण्याची शक्यता आहे. इंटरनेट सिक्युरिटी वॉचडॉग सिटीझन लॅबने म्हटले आहे की, हॅकर्स अॅपलच्या आयफोन आणि इतर उपकरणांमध्ये पेगासस घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. लॅबला गेल्या आठवड्यात असे आढळून आले होते की, हॅकर्स काही आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या डिव्हाइसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. सिटीझन लॅबने अॅपलला याबाबत माहिती दिल्यानंतर कंपनीने आता आयफोनमध्ये पेगासस इन्स्टॉल होऊ नये म्हणून नवीन सुरक्षा अपडेट जारी केले आहे.
टोरंटोच्या सायबर रिसर्च टीम सिटीझन लॅबची माहिती
आयफोनमधील पेगाससची माहिती टोरंटो विद्यापीठातील सायबर रिसर्च टीम सिटीझन लॅबने दिली आहे, यासोबतच सिटीझन लॅबने आयफोन आणि अॅपल उपकरण वापरणाऱ्यांना इशारा दिला आहे. लॅबकडून सांगण्यात येत आहे की, त्यांनी त्यांचे फोन आणि इतर उपकरण त्वरित अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
पेगासस बद्दल कसे कळले?
सोशल मीडीयावरील एका पोस्टमध्ये, सिटीझन लॅबने अहवाल दिला की, यूएस राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये गेल्या आठवड्यात एका व्यक्तीच्या डिव्हाइसची तपासणी करताना, डिव्हाइसमधील जीरो-क्लिक वल्नरेबिलिटीचा वापर करून NSO समुहाद्वारे पेगासस स्पायवेअर वितरित केले जात असल्याचे आढळले आहे.
स्पायवेअर कसा हेरगिरी करतो?
सिटीझन लॅबने या स्पायवेअरला BLASTPASS म्हटले, जे युजर्सना नकळत iOS (16.6) नव्या व्हर्जनवर चालणाऱ्या आयफोनला हानी पोहोचवू शकते, म्हणजे यूजर्सचा फोन हॅक होईल आणि त्यांना कळणारही नाही. सिटिझन लॅबने अॅपलला या मालवेअरची माहिती दिली, अॅपलने लगेचच त्याचे निराकरण करण्यासाठी विशेष अपडेट जारी केले. हे अपडेट iPhone, iPad, Mac कॉम्प्युटर आणि स्मार्टवॉचसह कंपनीच्या सर्व उत्पादनांसाठी आहेत.
स्पायवेअरपासून संरक्षण कसे करावे?
अॅपलने आपल्या यूजर्सला ताबडतोब आयफोन, आयपॅड, मॅक बुक आणि अॅपल वॉच अपडेट करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अॅपलच्या या तत्काळ कारवाईचे सिटीझन लॅबने कौतुक केले आहे.
अत्यंत धोकादायक स्पायवेअर
-पेगासस एक स्पायवेअर आहे,
-जो कोणत्याही फोन किंवा डिव्हाइसमध्ये गुप्तपणे Install केला जातो.
-यानंतर, यूजर्सची सर्व माहिती हॅकर्सकडे जाते.
-स्पायिंग सॉफ्टवेअर एका साध्या व्हॉट्सअॅप कॉलद्वारेदेखील पेगाससपर्यंत पोहोचू शकते.
-ज्या व्यक्तीला कॉल आला आहे, त्याने उत्तर दिले किंवा नाही, तो आपोआप फोनवर Install होईल
-ते फोनमधील विविध लॉग एंट्री डिलीट करते, जेणेकरून तुम्हाला याबाबत कळणार नाही
-इस्रायली कंपनी एनएसओने पेगासस विकसित केल्यानंतर विविध देशांना विकण्यास सुरुवात केली.
-हे सॉफ्टवेअर खूप महाग म्हटलं जाते, त्यामुळे सामान्य संस्था किंवा इतर ते विकत घेऊ शकत नाहीत.