Zivame Data Leaked : सध्या ऑनलाईन हॅकिंगच्या केसेस सातत्याने वाढत आहेत. याबाबत दरदिवशी कुणाच्या मोबाईलमधील अॅपद्वारे, फ्रॉड वेबसाईट आणि कम्प्युटर सिस्टीम हॅक  केल्याच्या घटना समोर येतात. अशातच एका शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन लोकांचा डेटा चोरीला (Zivame Data Leaked) गेल्याची घटना समोर आली आहे. Zivame या शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन 15 लाख भारतीय महिलांचा डेटा चोरीला गेला आहे. इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, हॅकरने Zivame वरुन डेटा चोरी केला आहे आणि याबदल्यात त्याने 500 डॉलर क्रिप्टो करन्सीची मागणीही केली आहे. याबाबत काही लोकांनी सोशल मीडियावर माहितीही शेअर केली आहे. पण याविषयी कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


Zivame हे महिलांच्या कपड्यांची विक्री करणारे शाॉपिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवरुन शॉपिंग करणाऱ्या महिलांचा मोबाईल क्रमांक, त्यांचा पत्ता, ई-मेल आयडी इत्यादी. यासारखी पर्सनल माहिती हॅकरने चोरी केला आहे. या चोरी केलेल्या डेटाची टेलिग्रामच्या ग्रुपच्या माध्यमातून विक्री केली जात आहे. या डेटाविषयी हॅकरशी संवाद साधण्यात आला. तेव्हा त्याने 15 भारतीय महिलांचा पर्सनल डेटाच्या बदल्यात 500 डॉलरच्या क्रिप्टो करन्सीची मागणी केली. यानंतर हॅकरने आधी काही महिलांचा सँपल डेटा शेअर केला आहे. या डेटाची इंडिया टुडेकडून पडताळणी करण्यात आली आहे. या प्रकारचा डेटा चोरी करण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये हॅकर्सकडून 7.1 मिलियन लिंक्डइन प्रोफाईल आणि 1.21 मिलियन रेंटोमोजो या फर्निचर रेटिंग स्टार्ट-अप कंपनीचा डेटा चोरी करण्यात आला आणि टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून विकला जात होता. 


व्हॉट्सअॅप कॉलद्वारेही होतात स्कॅम


हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगारांकडून व्हॉट्सअॅपद्वारे फेक कॉल करुन फसवणूक केलं जात आहे. अलिकडेच नोएडातील सेक्टर 61 मध्ये राहणाऱ्या महिलेशी हॅकर्सने संपर्क साधला आणि नोकरी देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली. या महिलेला सुरुवातीला युट्यूबवरील व्हिडीओज लाईक करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. यावर महिलेला काही पैसेही देण्यात आले. यामुळे महिलेचा कामावर विश्वास वाढला आहे. हे हॅकर्सना समजल्यानंतर महिलेला एक टास्क देण्यात आला आणि महिलेकडून 4 लाख रुपये लंपास करण्यात आले.


स्कॅम होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल? 


ऑनलाईन फसवणूक होऊ नये म्हणून लोकांनी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आपली पर्सनल माहिती कुण्याही व्यक्तीला शेअर करु नका. एखाद्या अनोळखी नंबरुवरुन फेक कॉल किंवा मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष करा. समजा, तुम्हाला वारंवार कॉल केला जात असेल, तर मोबाईल नंबरला ब्लॉक आणि रिपोर्ट करा. तुम्हाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीने फोनवरुन नोकरीचं आमिष दाखवलं असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नका.