Jio AirFibre: जियो युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जियोच्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जियो एअर फायबरबाबत मोठी घोषणा केली आहे. जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थी म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. Jio Air Fiber 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जियो एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याचीही शक्यता आहे.
मुकेश अंबानी AGM म्हणाले की जियो एअरफायबरसाठी दररोज 150,000 कनेक्शन दिले जाऊ शकतात. त्याच्या लॉन्चच्या तारखेची घोषणा करताना ते म्हणाले की, Jio AirFiber गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होईल.
Jio 5G मध्ये बदल घडवण्याची क्षमता
मुकेश अंबानी RIL AGM 2023 मध्ये म्हणाले की, Jio 5G मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. यामध्ये कृषी, शिक्षण, एमएसएमई आणि आरोग्य सेवा यांचा समावेश आहे.
जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य
आरआयएलचे सीएमडी मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनीचे जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. Jio हे नवीन भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं प्रतीक आहे आणि त्यानं आपल्या ध्येयाकडे मोठी पावलं उचलली आहेत. Jio 5G चं रोलआउट जगातील कोणत्याही कंपनीद्वारे सर्वात वेगवान 5G रोलआउट आहे.
डिसेंबरपर्यंत देशभरात 5G रोलआऊट होणार
Jio 5G ऑक्टोबरच्या अखेरीस रोलआऊट सुरू होईल आणि डिसेंबर 2023 पर्यंत ते देशभरात आणलं जाईल. जिओची देशात 85 टक्के 5G सेवा आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे.
जिओ एअर फायबर नेमकं आहे तरी काय?
Jio चे Jio AirFiber डिव्हाइस एक पोर्टेबल डिव्हाइस असणार आहे. नावाप्रमाणेच, हे डिव्हाइस पूर्णपणे वायरलेस असून इंटरनेटच्या मदतीनं वापरता येणार आहे. असं सांगितलं जात आहे की, Jio यामध्ये 5G अँटीना वापरणार आहे, ज्यामुळे युजर्सला वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल. Jio AirFiber सह युजर्स 1Gbps पर्यंत जलद कनेक्टिविटी मिळवू शकतो.
Jio AirFiber किती किमतीला उपलब्ध होणार? याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु जर आपण Jio चा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर कंपनी याला खूपच स्वस्त किंमतीत उपलब्ध करून देऊ शकते. या उपकरणात अनेक प्रकारच्या कनेक्टिव्हिटी सुविधाही उपलब्ध असतील. तुम्ही जिओ एअर फायबरमध्ये सिम तसेच सेट टॉप बॉक्सही वापरू शकता.