Unified Payments Interface: नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी)  श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ (Pravind Jugnauth) यांच्यासोबत संयुक्तपणे श्रीलंका (Sri Lanka) आणि मॉरिशसमध्ये यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवांचे आणि मॉरिशसमधील (Mauritius) रुपे कार्ड सेवांचं (RuPay Card) ऑनलाईन उद्‌घाटन केलं.


को-ब्रँडेड रुपे कार्ड हे मॉरिशसमध्ये स्थानिक कार्ड म्हणून निर्देशित केले जाईल, असं मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी सांगितलं. शुभारंभामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले. अयोध्या धाममध्ये श्री राम मंदिर प्राण  प्रतिष्ठेबद्दल श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी अनेक शतकं जुन्या आर्थिक संबंधांवर देखील भर दिला. संपर्कव्यवस्थेला मिळालेली चालना कायम राहील आणि दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा श्रीलंकेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली.


याप्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भारत, श्रीलंका आणि मॉरिशस या तीन मित्र राष्ट्रांसाठी आजचा दिवस विशेष आहे. ज्यावेळी त्यांचे ऐतिहासिक संबंध आधुनिक डिजिटल संबंधांचे रूप घेत आहेत. लोकांच्या विकासाप्रति असलेल्या सरकारच्या बांधिलकीचा हा पुरावा आहे, असं त्यांनी सांगितलं.  फिनटेक संपर्कव्यवस्था सीमेपलीकडील व्यवहार आणि संबंधाना अधिक बळकटी देईल, असं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं आहे. भारताचे यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच, यूपीआय आता एक नवी जबाबदारी पार पाडत आहे. भारतासोबत भागीदार जोडत आहे.", यावर पंतप्रधानांनी भर दिला.


UPI मार्फत गेल्या वर्षभरात 2 लाख कोटींचे व्यवहार 


डिजिटल सरकारी पायाभूत सुविधांनी भारतात क्रांतिकारक बदल घडवून आणला असून अगदी दुर्गम भागातील गावांमध्ये छोट्यात छोटा विक्रेता देखील युपीआयच्या माध्यमातून देवाणघेवाण  करत आहे आणि डिजिटल पद्धतीनं आर्थिक व्यवहार करतोय, ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. युपीआय व्यवहारांची सोय आणि वेग याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, युपीआयचा वापर करून गेल्या वर्षभरात 2 लाख कोटी रुपये मूल्याचं म्हणजेच, श्रीलंकेचे 8 ट्रिलीयन रुपये किंवा मॉरीशसचे 1 ट्रिलीयन रुपये इतक्या मूल्याचे 100 दशलक्षांहून अधिक व्यवहार करण्यात आले.


बँक खाती, आधार कार्ड आणि मोबाईल फोन यांच्या जेम त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक माणसापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवल्याचा उल्लेख करत लाभार्थ्यांच्या खात्यात 34 लाख कोटी रुपये म्हणजेच 400 अब्ज अमेरिकी डॉलर्स हस्तांतरित केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या को-विन मंचावरून  जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला. “तंत्रज्ञानाचा वापर पारदर्शकता, भष्टाचार कमी करणे आणि समाजात समावेशकता वाढवणे यांना प्रोत्साहन देत आहे,” पंतप्रधान म्हणाले.  


“शेजारधर्माला प्राधान्य  हे भारताचे धोरण आहे” यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. ते म्हणाले, “सागर म्हणजेच प्रदेशातील प्रत्येक देशासाठी सुरक्षितता आणि वृद्धी ही आमची सागरी संकल्पना आहे. भारत त्याच्या शेजारी देशांपासून वेगळा राहून विकास साधण्याचा विचार करत नाही.”


श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या गेल्या भारतभेटी दरम्यान स्विकारण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी आर्थिक संपर्कात मजबुती आणणे हा यात महत्त्वाचा घटक आहे यावर अधिक भर दिला. जी20 शिखर परिषदेदरम्यान विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्याशी देखील चर्चा केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.


श्रीलंका आणि मॉरीशस युपीआय सेवांशी जोडले जाणार 


श्रीलंका आणि मॉरीशस या देशांनी युपीआय व्यवस्थेशी जोडून घेतल्यामुळे त्यांना लाभ होईल आणि त्यांच्या डिजिटल कायापालटाला चालना मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्थांमध्ये सकारात्मक बदल घडून येतील तसेच पर्यटनाला चालना मिळेल याबाबत पंतप्रधान मोदी यांनी विश्वास व्यक्त केला. “युपीआय सुविधा असलेल्या पर्यटनस्थळांना  भारतीय पर्यटक  प्राधान्य देतील  असा मला विश्वास वाटतो. श्रीलंका आणि मॉरीशस मध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना तसेच तेथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या प्रणालीचा विशेष लाभ होईल,” ते पुढे म्हणाले.नेपाळ, भूतान, सिंगापूर, आणि आखाती देशांपैकी संयुक्त अरब अमिरात या देशानंतर आता आफ्रिकेत मॉरीशस रुपे कार्डाचे परिचालन सुरु होत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे भारतातून मॉरीशसला येणाऱ्या लोकांची चांगली सोय होईल.स्थानिक चलनातील नोटा तसेच नाणी विकत घेण्याची गरज कमी होईल. युपीआय तसेच रूपे कार्ड या प्रणालींमुळे वास्तव वेळेत, किफायतशीर आणि अत्यंत सुलभतेने आपल्या स्वतःच्या चलनात आपल्याला पैसे भरता येतील. येत्या काळात आपण सीमापार पैसे पाठवण्याचे व्यवहार पी2पी म्हणजे दोन व्यक्तींमध्ये थेट व्यवहार सुविधेच्या स्वरुपात करण्याच्या दिशेने लवकरच वाटचाल करू.