Gmail Blue Tick : सध्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील रथी-महारथीमध्ये ब्लू टिकवरून चांगलाचा खेळ रंगला आहे. एलॉन मस्क यांनी पहिल्यांदा ट्विटरच्या ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी नवीन नियमावली बनवली होती. यानंतर मेटानंही आपली ब्लू टिकबद्दलची पॉलिसी जाहीर केली होती. पण आता ब्लू टिक व्हेरिफेशन हे ट्विटर आणि मेटा पुरतीच मर्यादीत राहिलं नसून YouTube, TikTok, Pinterest यांच्यासह इतर डिजिटल प्लॅटफॉर्मसही ब्लू टिक व्हेरिफिकेशनची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.


अलीकडेच लिंक्डइनकडूनही ब्लू टिक व्हेरिफिकेशनची सुविधा जाहीर केली आहे. आता या स्पर्धेत गुगलनंही (Google) उडी मारली आहे. जीमेल ब्लू टिकची (Blue Tick) सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मिळत आहे. अर्थात, गुगलकडून आपल्या काही मोजक्या युजर्सना ब्लू टिकची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा Google Workspace, G Suite Basic शी जोडलेल्या युजर्सनाच मिळणार आहे.


'या' युजर्सना मिळणार GMAIL कडून ब्लू टिक


टेक क्रंचच्या  रिपोर्टनुसार, Google काही मोजक्या जीमेल युजर्सना ब्लू टिकची सुविधा देणार आहे. हे नवीन ब्लू टिक आपोआपच त्या कंपन्याच्या नावासमोर दिसून येईल ज्यांनी जीमेलच्या BIMI फिचरचा वापर केला आहे. हे फिचर  ब्रँड इंडिकेटर फॉर मॅसेज आयडेंटिफिकेशन (BIMI) या नावानं ओळखलं जातं. हे ब्लू टिक फक्त कंपन्यांसाठी आणि त्यांच्या नावाच्या ब्रँडसाठी असणार आहे. तसेच गुगलने  Google Workspace, G Suite Basic शी जोडलेल्या युजर्सनाच ब्लू टिकची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.


हे BIMI फिचर आहे तरी काय?


गुगलने 2021 मध्ये BIMI फिचरचं लाँच केलं होतं. या फिचरनुसार, जीमेलमध्ये Awatar च्या रूपात कंपनीचा लोगो दिसण्यासाठी समोरच्या सेंडरला स्ट्राँग व्हेरिफिकेशन कोडचा वापर  करावा लागणार आहे. यानंतरच ब्रँड लोगोला व्हेरिफाईड करता येणार आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीच्या लोगोच्या नावाच्या समोर ब्लू टिक दिसून येत असेल तर याचा अर्थ, BIMI  फिचरचा वापर केला आहे. यामुळे जीमेलवर समोरून आलेला मेल व्हेरिफाईड असून त्यावर विश्वास ठेवू शकाल. गुगलच्या म्हणण्यानसार, या नवीन फिचरमुळे अधिकृत जीमेल सेंडर्सची ओळख पटवण्यासाठी मदत होणार आहे आणि ब्लू टिक असलेल्या मेलवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. या ब्लू टिकसाठी कंपनीने अजूनही फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, मेटासारखं पैसे आकारल्याची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. फक्त युजर्सला अधिकाधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी BIMI फिचरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.