मुंबई : भारतीय टेलीकॉम युजर्सना आता हळूहळू 5G स्पीड नेटवर्कची सवय होत आहे, कारण Jio आणि Airtel त्यांच्या वापरकर्त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मोफत 5G सेवा देत आहेत. जेणेकरुन त्यांना या नवीन स्पीड इंटरनेटची सवय होईल आणि भविष्यात 5G योजना खरेदी करण्याचा विचार युजर्स करु शकतील.
भारतात 5G सेवा सुरु होऊन बरेच महिने झाले आहेत. Airtel आणि Jio या भारतातील दोन टेलिकॉम कंपन्या आहेत ज्यांनी या देशात पहिल्यांदा 5G सेवा सुरु केली. पण अद्याप या कंपन्यांनी 5G प्लॅन लॉन्च करण्यात आलेले नाही. याचा अर्थ असा की अद्याप कोणत्याही वापरकर्त्याने 5G योजना खरेदी केलेली नाही, परंतु तरीही बरेच वापरकर्ते 5G स्पीड नेटवर्कचा लाभ घेत आहेत.
5G मोफत सेवा बंद होणार
Jio आणि Airtel ने त्यांच्या वापरकर्त्यांना 5G सेवेचे फायदे जाणून घेण्यासाठी आणि त्यांना याची सवय लावण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मोफत अमर्यादित 5G सेवेची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या दोन कंपन्यांच्या काही निवडक युजर्सना 4G रिचार्जिंगवर अमर्यादित 5G सेवा मोफत दिली जात होती, परंतु आता असे होणार नाही. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अमर्यादित 5G सेवा लवकरच संपणार आहे. या अहवालानुसार, Jio आणि Airtel दोन्ही कंपन्या स्वतंत्र 5G कनेक्टिव्हिटी योजना देऊ शकतात. 5G प्लॅनची किंमत 4G प्लॅनपेक्षा 5 ते 10% जास्त असू शकते.
जागतिक स्तरावर, सर्वात वेगवान 5G सेवा भारतात आणली गेली आहे, जी केवळ एका वर्षात 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटींहून अधिक युजर्सपर्यंत पोहचलीये. तसेच Jio आणि Airtel या दोघांनीही अद्यापही त्यांच्या युजर्सना 5G सेवेसाठी शुल्क आकारले नाही. या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या संबंधित सर्वाधिक लोकप्रिय 4G प्लॅन्ससह, वापरकर्त्यांना अमर्यादित 5G प्लॅनची सुविधा मोफत दिली, जी अजूनही सुरू आहे.
कसे असणार 5G Prepaid Plans?
ET च्या अहवालात, टेलीकॉम इंडस्ट्रीमधील तज्ञांनी असा दावा केला आहे की, Jio आणि Airtel त्यांचे संबंधित 5G सेल्युलर प्लॅन्स जून 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान लॉन्च करू शकतात.
5G योजना खरेदी करण्यासाठी वापरकर्त्यांना 10% पर्यंत जास्त खर्च करावा लागू शकतो.
5G प्लॅनमध्ये, 4G प्लॅनच्या तुलनेत 30% जास्त इंटरनेट डेटा दिला जाऊ शकतो.
सध्या, 4G प्लॅनमध्ये, सामान्यतः 1.5GB ते 3GB प्रति दिवस डेटा प्लॅन दिला जातो, परंतु 5G प्लॅनमध्ये, सुमारे 2GB ते 4GB प्रतिदिन डेटा प्लॅन दिला जाऊ शकतो.
याशिवाय, ET च्या अहवालात असेही म्हटले आहे की 2024 मध्ये 5G प्लॅन लॉन्च करण्यासोबतच कंपन्या 4G प्लॅनचे दर देखील वाढवणार आहेत.
हेही वाचा :
आता WhatsApp अपडेट करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरची गरज लागणार नाही, आलं आहे 'हे' फिचर