ChatGPT : साधारण गेल्या  7-8 महिन्यापासून सगळीकडे कृत्रिम बुद्धीमत्तेवरून (Artificial Intelligence) चर्चा सुरू आहे. येत्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) अनेक क्षेत्रात वापर वाढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक क्षेत्रात एआय गेम चेंजर ठरू शकतो. सध्या बाजारात ओपन एआय कंपनीचे अनेक चॅटजीपीटी (ChatGPT) प्रॉडक्ट्स आली आहेत. अनेक कंपन्या आणि लोकं आपले काम सोपं करण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. अशातच चॅटजीपीटीशी संबंधित एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली आहे. एका लेखकाने एआय टूलच्या वापर करत एक वर्षाच्या आत 100 पेक्षा जास्त कांदबऱ्यांचे लिखाण केले आहेत. या कांदबऱ्यांच्या विक्रीतून त्याने लाखो रूपयांची कमाईसुद्धा केली आहे. 


'न्यूयॉर्क पोस्ट'च्या दिलेल्या वृत्तानुसार, टिम बाऊचर (Tim Boucher) नावाच्या एका लेखकाने ChatGPT आणि Anthropic's Claude AI टूलची मदत घेतली आणि एक वर्षाच्या आत 100 पेक्षा  जास्त कांदबऱ्या लिहिल्या आहेत. यासाठी टिमने एआयच्या मदतीने इमेजेसही तयार केल्या आहेत. लेखकाचा असा उद्देश्य होता की, 'सायन्स फिक्शनच्या अशा ई-बुक्स लिहायच्या की त्या कृत्रिम बुद्धीमतेला जोडता येतील. यानंतर टिम यांनी कांदबऱ्यांना  'AI Lore series'  असे नाव दिले. टिम यांनी म्हटले की, या पुस्तकांमुळे माणसाच्या क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देण्यात कृत्रिम बुद्धीमतेमुळे (AI) आश्चर्यकारक शक्यता निर्माण झाल्या आहेत. टिम यांनी ओपन एआयच्या चॅटजीपीटी व इमेज जनरेशन टूल्सचा वापर केला आणि कांदबऱ्या लिहिल्या होत्या. या कांदबऱ्या 5000 पेक्षा जास्त शब्द आणि अनेक इमेजने तयार करण्यात आल्या आहेत.  


कांदबऱ्या लिहून कमावले इतके रूपये


लेखक टिम यांनी अत्यंत कमी काळात कृत्रिम बुद्धीमतेच्या (AI) साहाय्याने बरीच पुस्तके लिहिली आहेत. सर्वात आश्चचकित करणारी गोष्ट म्हणजे टिम यांनी अत्यंत कमी वेळेत लेखन पूर्ण केलं. त्यांनी एक कांदबरी लिहून पूर्ण करण्यासाठी सरासरी तीन तासांचा कालावधी लागला. ऑगस्ट ते मे  या 10 महिन्याच्या दरम्यान 500 पुस्तकांची विक्री झाली. यादरम्यान लेखकाने घरी बसून 2000 डॉलर म्हणजे जवळपास 1,65,536 रूपयांची कमाई केली आहे. यावरून टिम यांचं काम क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रेरित करणारे आहे. त्यांनी एआयच्या मदतीने अत्यंत कमी वेळेत क्रिएटिव्ह लेखन केलं आहे. तसेच त्यांची पुस्तके पॉकेट फ्रेंडली असून सहज कुणीही विकत घेऊन वाचू शकते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


ChatGPT : 'अशा' कोणत्या नोकऱ्या ज्याची AI जागा घेऊ शकत नाही? ChatGPT ने दिलं उत्तर