Tim Cook on Apple Layoffs: सध्या जगभरात सुरु असलेल्या आर्थिक मंदीचा फटका अनेक कंपन्याना बसत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. फेसबुक,ट्विटर,अॅमेझॉन यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना कोरोनाच्या (Corona) महामारीमुळे आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये बरीच कर्मचारी कपात करण्यात येत आहे. तसेच आता अॅपल (Apple) देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याचं अॅपलचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांनी सांगितलं आहे. अॅपलमधली सर्वात मोठी कर्मचारी (LayOff) कपात होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. कॉस्ट कटिंगसाठी ही कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
काय म्हणाले टिम कुक?
वृत्तानुसार, टिम कुक यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, 'आता होणारी कर्मचारी कपात ही काही नवी गोष्ट नाही ज्यावर आपण चर्चा करायला हवी, शेवटचा उपाय म्हणून ही कर्मचारी कपात करण्यात येत आहे'. तसेच कर्मचारी कपातीचा निर्णय अनेक कंपन्यामध्ये घेण्यात आला आहे. 'तसेच ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे, त्यांनी लवकरात लवकर इतर विभागांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करावेत' असे देखील टिम कुक यांनी म्हटले आहे.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला अॅपलने आपल्या काही कर्मचाऱ्यांची कपात केली होती. इतर कंपन्यांनसारखे अॅपलने कोरोना काळात अतिरिक्त कर्मचाऱ्यांनी घेतले नसल्याने अॅपलमध्ये होणारी कर्मचारी कपात ही इतर कंपनींच्या मानाने कमी असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
अॅपलचे तिमाहीचे उत्पन्न किती ?
अॅपल चा मार्च तिमाही महसूल मागील आठवड्याच्या सुरुवातीला प्रदर्शित करण्यात आला. अॅपलने मार्च पर्यंतच्या तिमाहीचे निकाल नोंदवले आणि या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 94.8 अब्ज डॉलर कमाई अॅपलने केली आहे. परंतु तज्ञांनी केलेल्या विश्लेषणानुसार ही कमाई वार्षिक कमाईच्या 3 टक्क्यांनी कमी आहे. तर अॅपलने 24 अब्ज डॉलरचा नफा कमावत चांगली भरारी घेतल्याचं म्हटलं जात आहे.
अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर मंदीचे सावट दिसून येत आहे. यंदाचं वर्ष हे मंदीचं असल्याचं अनेकांनी यापूर्वी सांगितलं आहे. त्याचीच आता प्रचिती येत असल्याचं दिसून येतंय. अॅपलच्या या तिमाहीतील नफ्यात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळेच ही कंपनी येत्या काही काळात मोठी कर्मचारी कपात करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Go First पाठोपाठ आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर; प्रकरण नेमकं काय?