मुंबई : बुद्धीबळातील पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) याच्यासोबतच्या प्रदर्शनीय सामन्यात उद्योजक निखिल कामत (Nikhil Kamath) यानं विजय मिळवल्यानंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्य वाटलं. पण हा विजय संगणक आणि इतरांच्या मदतीनं साधला होता अशी कबुली खुद्द निखिल कामतनं सोशल मीडियावर दिली आहे. निखिलनं दिलेल्या कबुलीनंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. बुद्धीबळ सामन्याच्या निकालात फेरफार केल्याप्रकरणी आणि खेळभावनेचा भंग केल्याप्रकरणी झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या निखिल कामतचं चेस-डॉट कॉमवरचं खातं बंद करण्यात आलं आहे.
आनंद आणि कामत यांच्यातला ऑनलाईन सामना चेस-डॉट कॉमवरच झाला होता. या प्रकारानंतर निखिल कामतनं जाहीर माफीही मागितली आहे. निखिलनं आपण फेरफार केल्याची माहिती स्वतः ट्वीट करत दिली. 'एका बुद्धिबळ सामन्यात मी महान खेळाडू विश्वनाथन आनंदला पराभूत केले, असा अनेक जण विचार करत आहेत, पण ते हास्यास्पद आहे. हे म्हणजे उसेन बोल्टविरुद्ध 100 मीटरची शर्यत जिंकल्यासारखे आहे." असं निखिल कामतनं स्पष्ट केले.
पुढे बोलताना निखिल म्हणाला की, "लहान असताना आनंदशी चर्चा करण्याचे स्वप्न मी बाळगले होते. मदतनिधी उभारण्याकरिता आनंदशी काही सामने खेळण्याचे भाग्य मला लाभले. आनंदला पराभूत करताना मी संगणक, या खेळातील जाणकार तसेच अन्य गोष्टींची मदत घेतली. मदतनिधी सामना असल्याने फक्त मजा घेणे हा त्यामागील हेतू होता. पण यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे मी सर्वाची माफी मागतो."
निखिल कामतनं दिलेल्या स्पष्टीकरणानंतर विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदनही यासंदर्भात आपलं मत मांडलं, "बुद्धीबळाच्या पटावरील परिस्थितीप्रमाणे मी खेळत गेलो. प्रत्येकानेच तसे अनुकरण करावे, अशी अपेक्षा बाळगतो. लोकांसाठी मदतनिधी उभारण्याकरिता प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. खेळाच्या नीतिमूल्यांचे समर्थन करत हा माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता."
दरम्यान, झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या निखिल कामतवर सगळीकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. अशातच बुद्धीबळ सामन्याच्या निकालात फेरफार केल्याप्रकरणी आणि खेळभावनेचा भंग केल्याप्रकरणी निखिल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.