मुंबई: टीम इंडियाचा सिक्सर किंग आणि 2011 विश्वचषक, 2007 टी-20 विश्वचषकाचा हिरो युवराज सिंहनं 2019 विश्वचषकाबद्दल आता एक मोठं वक्तव्य केलं आहे.


 

मागील काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या युवराजनं 2019 साली विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या संघाच्या बाहेर असलेल्या या खेळाडूला अनेक संधी देण्यात आल्या. पण त्यां संधीचं त्याला सोनं करता आलं नाही. अखेर निवड समितीनं त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला.

 

टी-20 फॉर्मेटमध्ये युवराज सिंह हा हुकमाचा एक्का मानला जातो. टी-20 मध्ये युवराज नेहमीच आक्रमक असतो.

 

भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत युवराज म्हणाला की, 'जर तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत असाल तर तुम्हाला नक्की संधी मिळेल.'

 

इंडिया टुडे रिपोर्टनुसार युवराज म्हणाला की, 'ऑफ सीजनमध्ये मी फार कठोर मेहनत केली आहे. पुढे कोणतीही संधी मिळाल्यास मी त्याचा नक्कीच फायदा उठवेन. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं ही माझी प्राथमिकता आहे. मला संघात पुनरागमन करायचं आहे. जेव्हा मी दोन ते तीन वर्षानंतर निवृत्ती घेईन तेव्हा मला स्वत:विषयी अभिमान वाटायला हवा. तसं प्रदर्शन मला करायचं आहे. माझं लक्ष्य 2019 साली वनडे विश्वचषक खेळणं हे आहे.'