मुंबई : भारत आणि पाकिस्तानात या दोन देशांमध्ये वैर असलं तरी कला आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रेटींचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तानी क्रिकेट संघातही ऑफ फील्ड असंच मैत्रीपूर्ण नातं पाहायला मिळतं. त्यामुळे सिक्सरकिंग युवराजने ट्विटरवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला ट्रोल केलं.


शोएब अख्तरने ट्विटरवर स्वतःचा फोटो पोस्ट केला. 'कठोर मेहनतच तुम्हाला स्वप्नपूर्ती करण्यास मदत करु शकते' असं कॅप्शन त्या फोटोला दिलं. फोटोमध्येच 'तुमच्या ध्येयाबाबत महत्त्वाकांक्षी होण्यापासून घाबरु नका. कठोर मेहनत कधीच थांबत नाही. त्यामुळे तुमची स्वप्नंही थांबता कामा नयेत' हा ड्वेन जॉनसन म्हणजेच 'द रॉक'चा मोटिव्हेशनल कोट शोएबने फोटोवर लिहिला.


ट्वीट केलेल्या फोटोमध्ये शोएबने गॉगल लावला आहे. तसंच हातात ग्लोव्ह्ज घातले असून हेल्मेट धरलं आहे. हे पाहूनच युवराज सिंगला शोएबची फिरकी घेण्याची इच्छा अनावर झाली.

'हे तर ठीक आहे, पण तुम्ही वेल्डिंग करायला कुठे चाललात?' असा रिप्लाय शोएबच्या ट्वीटला करुन युवराजने प्रेरणादायी संदेशातली हवाच काढून टाकली. शोएबने मात्र अद्याप युवीला उत्तर दिलेलं नाही.