मुंबई : गॉल कसोटीत श्रीलंकेवर 304 धावांनी विजय मिळवल्यानंतर सध्या टीम इंडिया थोड्याशा मस्तीच्या मूडमध्ये आहे. या विजयानंतर तीन कसोटीच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


या विजयानंतर कोहली आणि टीम इंडिया मस्त एन्जॉय करत आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने दोन खास फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये कर्णधार कोहलीही सोबत आहे.

तापानं फणफणल्यानं केएल राहुल पहिल्या कसोटीत खेळू शकला नव्हता. पण आता तो अगदी फिट असून सध्या बरंच एन्जॉयही करत आहे. एवढंच नव्हे तर कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्यातही दंग आहे.

राहुलनं ट्विटरवर दोन फोटो शेअर केले असून त्यात असं म्हटलं आहे की, 'जेव्हा कर्णधार तुम्हाला सेल्फी काढायला सांगतो. तेव्हा फक्त पाउट करायचं.'

 

राहुलच्या या ट्विटवर युवराज सिंहनं त्याची ट्विटरवरच मस्करी केली. या ट्विटवर युवराज सिंह म्हणाला की, 'म्हणजे तुला हेच म्हणायचं आहे की, जेव्हाही तुमचा कर्णधार तुम्हाला सेल्फी काढायला सांगेल तेव्हा तुमच्याकडे पाउट करण्याशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय नसतो. मी सहमत आहे. जे कर्णधार म्हणतो ते करायलाच लागतं.'


युवराजच्या या मजेशीर ट्वीटनंतर राहुलनं त्याला तसंच मजेशीर उत्तर दिलं. 'होय पाजी, मला कोणीही सेल्फीसाठी विचारलं की, मी नेहमीच तयार असतो.'



दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त आहे. दुसरी कसोटी 3 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे.