युअर इंग्लिश बहुत अच्छा, शमीच्या 'बोलंदाजी'ने किवी गार
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2019 11:59 PM (IST)
सामनावीराचा किताब जाहीर होताच शमीला बोलावण्यात आला, तेव्हा सोबत कर्णधार कोहलीला त्याचा दुभाषी म्हणून पाचारण करण्यात आलं. मात्र सायमन डूलनी त्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर फाडफाड इंग्रजीत द्यायला सुरुवात करताच सारे आश्चर्यचकित झाले.
मुंबई : यजमान न्यूझीलंड संघावर 3-0 ने मात करत टीम इंडियाने वन डे मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. सामनावीर मोहम्मद शमीने गोलंदाजीने किवी संघाची दाणादाण तर उडवलीच, मात्र फाडफाड इंग्रजीत त्याने केलेल्या 'बोलंदाजी'मुळे मुलाखतकर्त्याच्या भूमिकेतील न्यूझीलंडचा माजी जलदगती गोलंदाज सायमन डूलही अवाक झाला. माऊण्ट मॉन्गॅनुईतील वनडेमध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवल्यानंतर विराट कोहली हा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये लागोपाठ 'वन डे मालिका' विजय मिळवणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. खरं तर भारताच्या खेळीला गोलंदाजांनी आकार दिला. शमीने 43 धावांच्या बदल्यात तीन विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर, पांड्या आणि चहल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. नेपियरमध्ये शमीने हिंदीत दिलेली उत्तरं कोहलीने इंग्रजीत भाषांतरित केली होती. त्यामुळे सामनावीराचा किताब जाहीर होताच शमीला बोलावण्यात आला, तेव्हा सोबत कर्णधार कोहलीला त्याचा दुभाषी म्हणून पाचारण करण्यात आलं. मात्र सायमन डूलनी त्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर फाडफाड इंग्रजीत द्यायला सुरुवात करताच सारे आश्चर्यचकित झाले. 'वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करणं कठीण होतं. कठीण असलं तरी अशक्य नव्हतं. भुवीची मदत झाली.' अशा आशयाचं उत्तर शमीने इंग्रजीत दिलं. हे ऐकून डूलच्या चेहऱ्यावरील नवल लपलं नाही. 'युअर इंग्लिश बहुत अच्छा, काँग्रॅच्युलेशन्स' अशा शब्दात डूलने कौतुक करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. न्यूझीलंडविरुद्धचा चौथा वनडे शुक्रवारी ऑकलंडमध्ये, तर पाचवा सामना रविवारी हॅमिल्टनमध्ये खेळवला जाणार आहे.