कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगानं वन डे क्रिकेटला अलविदा केला. आज कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेला बांगलादेशविरुद्धचा सामना मलिंगाच्या कारकीर्दीतला अखेरचा वन डे सामना ठरला. या अखेरच्या वन डेत मलिंगानं 38 धावांत बांगलादेशच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. गोलंदाजीची राऊंड आर्म शैली आणि अचूक यॉर्करमुळे मलिंगानं क्रिकेटविश्वात आपला वेगळा ठसा उमटवला. वन डे क्रिकेटमध्ये मलिंगानं श्रीलंकन क्रिकेटसाठी गेली 15 वर्ष भरीव योगदान दिलं. 2007 आणि 2011 साली वन डे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठलेल्या श्रीलंकन संघाच्या यशात मलिंगाचा मोठा वाटा होता.

मलिंगाने पत्नीच्या फेसबुक पेजवरून एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ‘शुक्रवारी तुम्ही मला अखेरचा एक दिवसीय सामना खेळताना पाहाल. माझा अखेरचा सामना पाहण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी नक्की या’, असे आवाहन त्याने क्रिकेट चाहत्यांना केले होते. दरम्यान मलिंगाने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आपण टी-20 क्रिकेट खेळत राहणार असल्याचे म्हटले आहे. टी-20 क्रिकेट वर्ल्डकप पर्यंत टी-20 सामने खेळणार आहे. वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळेल अशी आशा असल्याचे तो म्हणाला. तसेच श्रीलंकेला टी-20 वर्ल्डकप जिंकून देण्याचे माझे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया मलिंगा याने दिली. तसेच माझापेक्षा उत्तम खेळाडू माझ्या जागी खेळला तर मला अधिक आनंद होईल अशी खिलाडीवृत्ती मलिंगाने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये व्यक्त केली आहे.

नुकत्याच इंग्लंडमध्ये  वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचा संघ सेमी फायनल गाठू शकला नाही.  वर्ल्डकप स्पर्धेत मलिंगाने 7 लढतीत 13 बळी घेतले. 2004 साली मलिंगाने एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. मलिंगाने श्रीलंकेकडून 225 एक दिवसीय लढतीत 335 बळी मिळवले. मुरलीधरन (523 बळी) आणि चामिंडा वास (399 बळी) नंतर श्रीलंकेकडून सर्वाधिक बळी मलिंगाच्या नावावर आहेत. तसेच 30 कसोटीत 101 बळी आणि 73 टी-30 लढतीत 97 बळींची नोंद मलिंगाच्या खात्यात आहे.