डर्बी: महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्याआधी डर्बीत पावसाचा खेळ सुरु झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळविण्यात येणाऱ्या उपांत्य सामन्याआधी पावसानं हजेरी लावल्यानं सामना उशिरानं सुरु होण्याची शक्यता आहे. जर हा सामना आज झाला नाही, तर उद्या खेळविण्यात येईल.


याआधी 18 जुलैला इंग्लंड आणि द. आफ्रिकामध्ये पहिला उपांत्य सामना खेळविण्यात आला होता. यामध्ये इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेवर दोन गडी राखून विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली होती.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात जर भारतीय संघानं विजय मिळवला तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ दुसऱ्यांदा प्रवेश करेल. याआधी भारतानं 2005 साली फायनलमध्ये धडक मारली होती.

टीम इंडियानं ग्रुप स्टेजमध्ये 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियानं 7 पैकी 6 सामन्यात बाजी मारली आहे.

दरम्यान, आजवरच्या दहा महिला विश्वचषकांमध्ये ऑस्ट्रेलियाने सहावेळा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. तसंच वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. उभय संघांमधल्या 42पैकी 34 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला असून, भारताला केवळ आठ सामने जिंकता आले आहेत.