कोलकाता: 'प्रशिक्षक रवी शास्त्री हे कायमच सकारात्मक असतात. यापुढे देखील ते असेच सकारात्मक असतील.' असं मत भारतीय कसोटी संघाचा विकेटकीपर रिद्धिमान साहानं व्यक्त केलं आहे.

श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी साहा म्हणाला की, 'शास्त्री हे फारच सकारात्मक कोच आहेत. जेव्हा ते संचालक होते त्यावेळी देखील ते खेळाडूंना कायम सांगायचे की, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि जास्त बचावात्मक होऊ नका.'

कोच बदलल्यानं काही फरक पडतो का? असा प्रश्न विचारल्यानंतर साहा म्हणाला की, 'रवी भाई असो या अनिल भाई दोघांनाही आपला संघ जिंकताना पाहणं आवडतं. खेळाडू म्हणून आमचीही हीच इच्छा असते. पण प्रत्येक कोचचं काम करण्याची पद्धत वेगळी असते.'



'मला वाटत नाही की, कोच बदलल्यानं फार काही फरक पडेल. आम्ही बऱ्याच दिवसांनंतर कसोटी क्रिकेट खेळणार आहोत. त्यामुळे मागील कसोटी सामने आम्ही ज्या पद्धतीनं खेळलो होतो त्याच पद्धतीनं श्रीलंकेविरुद्धही खेळण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.' असंही साहा यावेळी म्हणाला.

दरम्यान, रवी शास्त्री यांची नुकतीच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. याआधी रवी शास्त्री हे 2007 साली बांगलादेश दौऱ्यावर टीम मॅनेजर म्हणून गेले होते. त्यानंतर 2014 ते 2016 मध्ये ते टीम इंडियाचे संचालक होते.