अँटिगा : हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघाचं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातलं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यावर इंग्लंडने निर्विवाद वर्चस्व गाजवून, भारताचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. त्यामुळे अंतिम फेरीत खेळण्याचं भारतीय संघाचं स्वप्न भंगलं आहे.
इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय संघाचा विसाव्या षटकांत 112 धावांत खुर्दा उडवला. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी अवघ्या 113 धावांचं लक्ष्य होतं. मग अॅमी जोन्स आणि नताली सिवरने तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची अभेद्य भागीदारी रचून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. जोन्सने नाबाद 53 धावांची आणि सिवरने नाबाद 52 धावांची खेळी केली.
त्याआधी, भारताकडून स्मृती मानधनाने 23 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 34 धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्सने 26 आणि हरमनप्रीत कौरने 16 धावांची खेळी रचून भारतीय डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आता ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांत अंतिम सामना पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 71 धावांनी धुव्वा उडवून महिला ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाने या उपांत्य सामन्यात विंडीजसमोर विजयासाठी 143 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा डाव अवघ्या 71 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून अॅलिस पेरी, अॅशले गार्डनर आणि डेलिसा किमिन्सने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
त्याआधी कर्णधार अॅलिसा हिलीच्या दमदार फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत पाच बाद 142 धावांची मजल मारुन दिली. हिलीने 38 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 46 धावांची खेळी उभारली.