कोलकाता : टीम इंडियाचा कसोटी यष्टिरक्षक रिद्धीमान साहाने कोलकात्यातल्या स्थानिक ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात अवघ्या 20 चेंडूंमध्येच शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला. साहाने मोहन बागान क्लबकडून खेळताना बंगाल नागपूर रेल्वे संघाविरुद्ध ही कामगिरी केली.

साहाने 102 धावांच्या खेळीत तब्बल 14 षटकार आणि 4 चौकार ठोकले. साहाच्या या खेळीने बंगाल नागपूर संघाने दिलेलं 152 धावांचं आव्हान मोहन बागानने केवळ सात षटकात पार केलं. 510 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात साहा सनरायजर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. आयपीएलपूर्वी त्याला शानदार सूर गवसला.

यापूर्वी 2 नोव्हेंबर 1931 साली सर डॉन ब्रॅडमन यांनी 22 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं होतं. तीन षटकांचा (प्रत्येकी 8 चेंडू) सामना त्यांनी केला होता. पहिल्या षटकात 38, दुसऱ्या षटकात 40 आणि तिसऱ्या षटकात 27 धावा कुटत त्यांनी शतक पूर्ण केलं होतं.