Wrestlers Protest Row: पर्यवेक्षण समितीची औपचारिक नियुक्ती होईपर्यंत केंद्र सरकारनं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे सर्व कार्यक्रम आणि कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं शनिवारी (21 जानेवारी) सांगितलं की, यामध्ये सध्या सुरू असलेल्या क्रमवारीतील स्पर्धेचं निलंबन आणि सुरू असलेल्या उपक्रमांसाठी सहभागींकडून आकारलं जाणारं प्रवेश शुल्क परत करणं याचादेखील समावेश आहे.  


सरकारनं 20 जानेवारी रोजी WFI च्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवणारी एक निरीक्षण समिती नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही घोषणा झाली. यासोबतच WFI चे अतिरिक्त सचिव विनोद तोमर यांनाही तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर कुस्तीपटूंनी शुक्रवारी आपलं आंदोलन मागे घेतलं. 






सात सदस्यीय समितीची स्थापना 


भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) नं शुक्रवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मेरी कोम आणि योगेश्वर दत्त यांच्यासह सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. दरम्यान, आंदोलक कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडेही चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती.


कुस्तीपटूंचं आंदोलन अखेर मागे 


भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अध्यक्षा उषा यांना लिहिलेल्या पत्रात, कुस्तीपटूंनी दावा केला आहे की, राष्ट्रीय शिबिरातील प्रशिक्षक आणि क्रीडा विज्ञान कर्मचारी पूर्णपणे असक्षम आहेत, शिवाय WFI कडून (निधीमध्ये) आर्थिक अनियमितता केली जात असल्याचा आरोपही कुस्तीपटूंकडून केला जात आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.


WFI चं म्हणणं काय? 


क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, बृजभूषण शरण सिंह यांच्यासह रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कारभारावर कुस्तीपटूंकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याची दखल क्रीडा मंत्रालयानं घेतली असून संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून ही समिती पुढच्या चार आठवड्यांत अहवाल सादर करणार आहे. यासोबतच कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह या प्रकरणाची समितीकडून चौकशी होईपर्यंत पदाच्या जबाबदारीतून माघार घेणार आहेत. यासर्व प्रकरणाबाबत WFI नं आपल्या उत्तरात क्रीडा मंत्रालयाला सांगितलं होतं की, WFI मध्ये अध्यक्षांसह इतर कोणालाही वैयक्तिकरित्या मनमानी किंवा गैरव्यवस्थापन करण्याचा अधिकार नाही. तसेच, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियानं कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचं वेळोवेळी खंडन करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Wrestlers Protest Ended: क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे; समिती चार आठवड्यात WFI प्रमुखांविरोधात अहवाल देणार