Vinesh Phogat leaves Awards on Kartavya Path : आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विनेश फोगटने महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ आपले पुरस्कार परत केले आहेत. विनेश फोगटने आज शनिवारी (30 डिसेंबर) कर्तव्यपथावर पुरस्कार ठेवला. विनेश फोगट पुरस्कार परत करण्यासाठी पीएमओमध्ये जात असताना पोलिसांनी अडवले. यानंतर कर्तव्यपथावर पुरस्कार सोडला. फोगटने तीन दिवसांपूर्वी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती.






सरकार त्रास देत असल्याचा युवक काँग्रेसचा आरोप 


युवक काँग्रेसने ही घटना देशासाठी लाजिरवाणी दिवस असल्याचे म्हटले आहे. युवक काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, "देशासाठी लाजिरवाणा दिवस. कुस्तीपटू बजरंग पुनियानंतर देशासाठी पदक जिंकणारी मुलगी विनेश फोगटने आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाबाहेर ठेवला आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने त्यांच्यावर इतका अत्याचार केला की आज त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे.






पीएम मोदींना पत्र लिहिले


तत्पूर्वी, भारतीय कुस्ती महासंघ (WFI) संदर्भात सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले होते, ज्यामध्ये तिने संपूर्ण घटनेबद्दल आणि WFI चे नवीन अध्यक्ष संजय सिंह यांच्या निवडीबद्दल निराशा व्यक्त केली होती. पत्रात विनेश फोगटने महिला कुस्तीपटूंना न्याय न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली होती आणि ती अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले होते.


बजरंग पुनियाने पद्मश्री परत केला


याआधी कुस्तीपटू बजरंग पुनियानेही आपला पद्मश्री पुरस्कार परत केला होता. निषेध म्हणून त्याने कर्तव्य पथाच्या फूटपाथवर आपला पुरस्कार सोडला होता. त्याचवेळी साक्षी मलिकने पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित WFI पॅनलच्या निषेधार्थ निवृत्ती घेतली होती.


बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एल्गार


अनेक महिला कुस्तीपटूंनी माजी WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासह देशातील अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण विरोधात अनेक महिने विरोध केला होता.


बृजभूषण सिंह यांना आणखी एक झटका


दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या निवासस्थानातून (Brij Bhushan Sharan Singh) कार्यालय हटवण्यात आलं आहे.  बृजभूषण सिंह यांचा परिसर रिकामा केल्यानंतर WFI नवी दिल्लीतील नवीन पत्त्यावरून काम करेल." WFI चे नवीन कार्यालय नवी दिल्लीतील हरी नगर भागात आहे. 24 डिसेंबर रोजी क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन केलेल्या WFI पॅनेलला निलंबित केले होते. संजय सिंह यांची WFI अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तीन दिवसांनी मंत्रालयाने हे पाऊल उचलले होते. बृजभूषण यांच्या निवासस्थानातून सुरू असलेलं कार्यालय हेही या कठोर कारवाईमागे एक कारण असल्याचे सांगण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या