महाराष्ट्राचा पैलवान नरसिंह यादव लग्नाच्या बेडीत
एबीपी माझा वेब टीम | 10 Mar 2017 09:09 PM (IST)
मुंबई : महाराष्ट्राचा ऑलिम्पियन पैलवान नरसिंह यादव आज हरियाणाच्या सॅफ गेम्स सुवर्णपदकविजेत्या पैलवान शिल्पी शिवरानसोबत विवाहबंधनात अडकला. नरसिंग आणि शिल्पीचा विवाहसोहळा मुंबईनजिकच्या मीरा-भाईंदर परिसरात संपन्न झाला. 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकच्या सराव शिबिरात नरसिंहने शिल्पीला पहिल्यांदा पाहिलं. शिल्पीच्या सरावातला प्रामाणिकपणा पाहून त्याचं तिच्यावर प्रेम जडलं. नरसिंहने त्याच शिबिरात शिल्पीला प्रपोज केलं होतं. पण शिल्पीने कुटुंबियांची परवानगी घेऊनच नरसिंह यादवला होकार कळवला. अखेर ते दोघं आज विवाहबद्ध झाले. दरम्यान दोन आठवड्यांपूर्वीच नरसिंह यादवला महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उपअधीक्षक पदावर नोकरीही देण्यात आली आहे.