मुंबई : महाराष्ट्राचा सुपर हेवीवेट पैलवान अभिजीत कटकेने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी भारताच्या 23 वर्षांखालील संघात स्थान मिळवलं आहे. हरयाणातल्या सोनीपतमध्ये आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत अभिजीतने 125 किलो वजनी गटाचं, तर महाराष्ट्राच्याच सोनबा गोंगाणे 61 किलो वजनी गटाचं सर्वोत्तम ठरण्याचा मान मिळवला. याच कामगिरीच्या निकषावर त्या दोघांची 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. येत्या 21 ते 24 मार्च या कालावधीत मंगोलियातल्या उलनबटोरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.


अभिजीत कटके हा मूळचा पुण्याच्या शिवरामदादा तालमीचा पैलवान असून, त्याने 2017 साली महाराष्ट्र केसरी किताबाचा मान मिळवला होता. 2018 साली अभिजीतने 23 वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्तीत सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. पण 2018 सालच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीत त्याला बाला रफिक शेखकडून हार स्वीकारावी लागली होती. मात्र त्या पराभवाने निराश न होता अभिजीतने 125 किलो वजनी गटाच्या राष्ट्रीय निवड चाचणीत सर्वोत्तम येण्याचा मान मिळवला आहे.


सोनबा गोंगाणे हा देखील 61 किलो वजनी गटात महाराष्ट्राचा नावाजलेला पैलवान आहे. तो सेनादलाच्या सेवेत आहे. पुण्यात झालेल्या मातीतल्या पहिल्या राष्ट्रीय कुस्तीत सोनबा गोंगाणे हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. सोनबा हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा गावचा आहे.