नूर सुलतान (कझाकस्तान) : भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. बजरंगपाठोपाठ भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियानेही जागतिक कुस्तीत 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. रवीने इराणच्या रेजा अहमदालीला 6-3 अशा फरकाने पराभूत केले. या कामगिरीसह रवी कुमारनेही टोकियो ऑलिम्पिकसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे.

दरम्यान, जागतिक कुस्ती स्पर्धेचा माजी सुवर्णविजेता पैलवान सुशील कुमारला कझाकस्तानमध्ये सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 74 किलो गटाच्या सामन्यात अझरबैजानच्या खाजीमुरादनं सुशील कुमारवर 11-9 अशी मात केली. या लढतीत सुशील कुमार 9-4 असा आघाडीवर होता. पण त्यानंतर खाजीमुरादनं सलग सात गुण घेत सुशीलला पराभवाचा धक्का दिला. सुशीलकुमारनं 2010 साली याच स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर नऊ वर्षांनंतर सुशीलकुमारनं जागतिक कुस्ती स्पर्धेत पुनरागमन केलं होतं.