नॉटिंगहॅम: वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च 481 धावांची नोंद केलेल्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 242 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 5 सामन्यांची वन डे मालिका 3-0 अशी खिशात टाकली.
नॉटिंगहॅम वन डेत प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या अक्षरश: चिंधड्या उडवत, 50 षटकात 6 बाद 481 धावांच्या विश्वविक्रमाची नोंद केली.
हे बलाढ्य लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेली कांगारु टीम अवघ्या 239 धावात गुंडाळली. ऑस्ट्रेलियन संघाला 50 षटकंही खेळता आली नाहीत. त्यांचे सर्व फलंदाज अवघ्या 37 षटकातंच माघारी परतले.
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रेविस हेडने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर इंग्लंडकडून अदिल रशीदने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडची विक्रमी धावसंख्या
इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नॉटिंगहॅम वन डेत सहा बाद 481धावांची मजल मारून, वन डे क्रिकेटमधल्या सर्वाधिक धावांच्या विश्वविक्रमाची नोंद केली. वन डे क्रिकेटमधला याआधीचा उच्चांक इंग्लंडच्याच नावावर होता. 2016 साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडनं तीन बाद 444 धावांची मजल मारली होती.
मात्र कालच्या सामन्यात इंग्लंडनं स्वत:चाच विक्रम मोडीत काढला.
सलामीला उतरलेल्या बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी पहिल्या विकेटसाठी 19.3 षटकांमध्येच 159 धावांची भागीदारी केली. 61 चेंडूत 82 धावांवर जेसन रॉय धावबाद झाला. मात्र त्याच्या या वेगवान खेळीला पुढे नेण्यासाठी बेअरस्टोला हेल्सने साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी करत 35 षटकांमध्येच 300 धावांची मजल मारुन दिली.
अॅश्टन एगरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी बेअरस्टोने 92 चेंडूत 15 चौकार आणि पाच षटकारांनी त्याची खेळी सजवली होती. बेअरस्टोनंतर बटलर (11) स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन मैदानात उतरला. येताच त्याने धमाका सुरु केला. 43 धावांवर पोहोचताच मॉर्गन इंग्लंडचा वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने सध्या संघातून बाहेर असलेल्या इयान बेलच्या 5416 धावांना मागे टाकलं.
पहिला विक्रम मोडताच मॉर्गनची नजर दुसऱ्या विक्रमावर होती. त्याने 21 चेंडूतच अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडचा सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. मॉर्गन आणि हेल्सने चौथ्या विकेटसाठी 10 षटकात 124 धावा ठोकल्या.
या सामन्यात झालेले विक्रम
वन डेतील सर्वाधिक धावसंख्या - इंग्लंड 481/6
इंग्लंडकडून वेगवान अर्धशतक - इयॉन मॉर्गन - 21 चेंडूत 50 धावा
इंग्लंडकडून सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज- इयॉन मॉर्गन
ऑस्ट्रेलियाची पराभवाची मालिका
या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिका 0-3 ने गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने गमावलेली ही सलग पाचवी मालिका आहे.
तर इंग्लंडविरुद्धच्या 9 पैकी 8 वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे.
इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाने विविध संघांशी खेळलेल्या शेवटच्या 16 वन डे सामन्यांमध्ये केवळ 2 सामन्यातच त्यांना विजय मिळवता आला आहे.
संबंधित बातम्या
इंग्लंडची वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात मोठी धावसंख्या
इंग्लंडच्या 481 धावांचा पाठलाग करताना कांगारुंना फेस, अख्खा संघ 239 धावांत गारद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jun 2018 08:09 AM (IST)
नॉटिंगहॅम वन डेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 242 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 5 सामन्यांची वन डे मालिका 3-0 अशी खिशात टाकली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -