WI vs NED WC Qualifiers: नेदरलँडने एकदिवसीय विश्वचषकाच्या क्वालिफायर फेरीमध्ये सोमवारी मोठा उलटफेर केलाय. रोमांचक सामन्यात दोन वेळच्या जगतजेत्या वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला. सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड संघाने वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली. वेस्ट इंडिज संघाने प्रथम फंलदाजी करत 374 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडच्या संघानेही 374 धावांपर्यंत मजल मारली अन् सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने 30 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाला फक्त आठ धावाच करता आल्या. परिणामी दोन वेळच्या जगतजेत्या वेस्ट इंडिजवर पराभव ओढवला. या पराभवामुळे वेस्ट इंडिजचे स्पर्धेतील आव्हान खडतर झालेय. 


सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडचा फलंदाज लोगन व्हॅन बीक याने अनुभवी जेसन होल्डरची चांगलीच धुलाई केली. त्याने सहा चेंडूत तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 30 धावांचा पाऊस पाडला. त्याशिवाय या धावांचा बचाव करताना बीक याने दोन विकेट घेतल्या. जॉनसन चार्ल्स याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत चांगली सुरुवात केली. पण फलंदाजीत दमदार कामगिरी करणाऱ्या बीक याने पुढील दोन चेंडूंवर फक्त दोन धावा खर्च केल्या. चौथ्या षटकात चार्ल्सने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. तसेच, पुढच्या चेंडूवर होल्डरही तंबूत परतला. अशाप्रकारे वनडे क्रिकेट इतिहासातील तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड संघाने बाजी मारली.  सुपर ओव्हरमध्ये विडिंजचा संघ फक्त आठ धावा करु शकला. 






वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 374 धावांपर्यंत मजल मारली. निकोलस पूरन याने दमदार फलंदाजी करताना अवघ्या 65 चेंडूत शतकी खेळी केली. पूरन याने सहा षटकार आणि नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची खेळी केली. चार्ल्स आणि किंग यांनी अर्धशतकी खेळी केली. नेदरलँडकडून दोन गोलंदाजांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतली. वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड संघानेही दमदार सुरुवात केली. 
तेजा निदामानुरू याने शानदार फलंदाजी करत 76 चेंडूत  3 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 111 धावा केल्या.  लोगन याने अखेरच्या षटकांमध्ये 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 28 धावा कुटल्या. यामुळे नेदरलँड संघानेही 50 षटकात 9 विकेट्स गमावत 374 धावा केल्या होत्या. सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करण्यात नेदरलँडला यश मिळाले.  दोन वेळा विश्वचषक उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजवर यंदाच्या विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे.