T20 World Cup 2022 : पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघानं टी 20 विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या जिगरबाज खेळीच्या बळावर भारतानं पाकिस्तानचा चार गड्यांनी पराभूत केला. भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवत युएईमधील विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला आहे. विराट कोहलीनं 82 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं तीन विकेट आणि 40 धावांची अशी अष्टपैलू कामगिरी केली. त्याशिवाय अर्शदीपने तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. या विजयानंतर क्रीडा चाहत्यांपासून ते राजकीय नेते आणि आजी-माजी क्रिकेटपटूंनी आनंद साजरा केला. कुणी रस्त्यावर उतरले तर कुणी फटाक्या फोडल्या. कोण ढोल ताश्याच्या तालावर नाचलं. मेलबर्नच्या मैदानामध्ये अंगावर शहारा आणणारा प्रसंग होता. जवळपास एक लाख लोक सामना पाहण्यासाठी आले होते. यामध्ये सर्वाधिक संख्या भारतीयांची होती. समालोचन करणारे मंडळीही हा थरारक सामना पाहत होते. त्याविजयानंतर त्यांना विजयी जल्लोष करयचा मोह आवरला नाही. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, के श्रीकांत आणि इरफान पठाण यांनी विजयानंतर जल्लोष साजरा केला. विजयी जल्लोष साजरा करताना सुनील गावसकर यांच्यामध्ये लहान मुलं संचारल्याचं पाहायला मिळलं. एखाद्या निरागस बालकाप्रमाणे गावसकरांनी विजयी जल्लोष सादरा केला. 


सुनील गावसकर यांनी स्टेडिअममधील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये इरफान पठाण आणि श्रीकांत यांच्यासोबत ते सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. अखेरच्या चेंडूवर एक धावेची गरज होती. श्वास रोखणाऱ्या या सामन्यात भारताने बाजी मारली. त्यानंतर सर्वच ठिकाणी जल्लोष करण्यात आला. सुनील गावसकर यांनीही उड्या मारत जल्लोष साजरा केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. 


पाहा व्हिडीओ -






रोहित शर्माच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानला लोळवून सनसनाटी विजयी सलामी दिली. टीम इंडियानं हा सामना चार विकेट्सनी जिंकला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सातव्या षटकांत चार बाद ३१ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण विराट कोहली आणि हार्दिक पंड्यानं पाचव्या विकेटसाठी 113 धावांची झुंजार भागीदारी रचली. त्यांच्या या भागिदारीनं भारताला विजयाच्या दिशेनं नेलं. हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक मोक्याच्या क्षणी बाद झाले. पण विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विननं भारताच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केलं. टीम इंडियाला अखेरच्या 18 चेंडूंत विजयासाठी ४८ धावांची आवश्यकता होती. त्या परिस्थितीत भारतीय फलंदाजांनी शाहिन आफ्रिदीच्या षटकात 17 धावांची, हॅरिस रौफच्या षटकात 15 धावांची आणि मोहम्मद नवाझच्या अखेरच्या षटकात 16 धावांची लूट केली.