T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेला फायनली सुरुवात झाली आहे. नुकताच पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया (SL vs NAM) यांच्यात पार पडला असून यामध्ये नामिबिया संघाने ऐतिहासिक विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने श्रीलंकेला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले. ज्यानंतर श्रीलंकेचा संघ मात्र 19 षटकांत 108 धावा करुन ऑलआऊट झाला ज्यामुळे नामिबायाने 55 धावांनी सामना जिंकत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. नामिबियाकडून जॅन फ्रायलिंकने 28 चेंडूत ठोकलेल्या 44 धावा नामिबियासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.






सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबिया संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दोन्ही सलामीवीर 3 आणि 9 अशा धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर इटॉन आणि बार्ड यांनी अनुक्रमे 20 आणि 26 धावांचं योगदान देत संघाचा डाव सावरला. दोघेही बाद झाल्यावर कर्णधार इरॉसमसने 20 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर जॅन फ्रायलिंकने 28 चेंडूत 4 चौकार खेचत 44 रन केले. तर शेवटच्या फळीतील फलंदाज स्मिटने 16 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार टोकत 31 रन केले. ज्यामुळे नामिबियाने 163 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मधुशनने दोन तर महेश थीक्षना, चमीरा आणि करुणारत्ने यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 


164 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला चमकदार कामिगरी करता आली नाही. सलामीवीर 9, 6 अशा धावांवर बाद झाले. धनंजयाने 12 धावा केल्या पण तो बाद झाला, तसंच अनुभवी गुणथलिकातर खातंही खोलू शकला नाही. कर्णधार दासुनने सर्वाधिक 29 धावा केल्या तर भानुका राजपक्षाने 20 धावा केल्या पण दोघांच्या बाद झाल्यानंतर पुढील फलंदाजांना डाव सावरता आला नाही आणि संपूर्ण संघ 108 धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे नामिबियाने 55 धावांनी सामना जिंकला. नामिबियाकडून डेविड विसे, बर्नार्ड स्कॉल्ट्झ, बेन शिंकोगो आणि जॅन फ्रायलिंक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तर जेजे स्मिटने एक विकेट घेतली. जॅनने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये केलेल्या कमाल कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.


हे देखील वाचा-