Sri lanka Cricketer Danushka Gunathilaka News : श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका (Danushka Gunthilaka) याच्यावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर तिथेच त्याला अटकही करण्यात आली होतं. पण जवळपास 11 दिवसानंतर त्याला दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन कोर्टाने त्याला सशर्त जामीन दिला आहे. गुणथिलाकाला श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या मदतीने हा जामीन मिळाला असून, त्यांनी जामिनासाठी मोठी रक्कम देखील भरली आहे. गुनाथिलका याचा जामीन अर्ज 7 नोव्हेंबर रोजी फेटाळण्यात आला होता. यानंतर त्यांना 11 रात्री लॉकअपमध्ये काढाव्या लागल्या आणि अखेर आता त्याला जामीन मंजूर झाला आहे.


'या' अटीनंतर जामीन मंजूर


गुणथिलाकाला जामीन मिळवून देण्यासाठी श्रीलंका बोर्डाने न्यायालयात एक कोटी रुपये जमा केले आहेत. असे असतानाही त्यांना अनेक अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुणथिलकाला पोलिसात जाऊन हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत त्याला कर्फ्यूमध्ये राहावे लागणार आहे. तो कोणत्याही परिस्थितीत पीडित महिलेला भेटू शकत नाही. याशिवाय तो टिंडर किंवा इतर कोणतेही डेटिंग अॅप वापरू शकत नाही. 


नेमकं प्रकरण काय?


सिडनी पोलिसांनी रविवारी पहाटे श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाकाला अटक केली. एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर सिडनी पोलिसांनी श्रीलंका टीम थांबलेल्या हॉटेलमधून दानुष्काला अटक केली होती. सध्या दानुष्का सिडनीत असून श्रीलंकेचा उर्वरित संघ कोलंबोला परतला आहे. दरम्यान न्यू साउथ वेल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघांची भेट झाली. 2 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी दानुष्काने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. ही घटना 'रोझ बे' या महिलेच्या निवासस्थानीच घडली. क्राईम सीनची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी 31 वर्षीय दानुष्काला सिडनीतील ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून अटक केली, अशीही माहिती समोर आली होती.


टी20 वर्ल्डकपमध्येच गुणथिलाकाला दुखापत


टी-20 विश्वचषक स्पर्धेत दानुष्का गुणथिलाका हा श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. मात्र, तो फक्त एकच सामना खेळू शकला. नामिबियाविरोधात त्याने एकमेव सामना खेळला. त्यानंतर दुखापतग्रस्त झाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला. त्याच्याजागी अशीन बंदारा याचा समावेश श्रीलंकेच्या संघात करण्यात आला होता. दुखापतीमुळे  स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याला संघासोबत ठेवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता. 


दानुष्का गुणथिलाका हा डावखुरा फलंदाज असून त्याने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 2500 पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. गुणथिलाकाने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दानुष्का गुणथिलाकाने 47 वनडे, 46 टी-20 सामने आणि आठ कसोटी सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने वनडे मध्ये दोन शतकं झळकावली आहेत