Rohit Sharma, T20 World Cup 2022 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली टीम इंडिया T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत उद्या पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. पाकिस्तानविरुद्धचा हा सामना मेलबर्नमध्ये होणार असून यापूर्वी शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या T20 विश्वचषकाची तयारी आणि पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्याबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात त्याने दिलेल्या उत्तरातून स्पर्धेदरम्यान भारतीय संघाच्या अंतिम 11 मध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे. 

पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्माला टीम इंडियाच्या प्लेईंग-11 बाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की, प्रत्येक सामन्यातील परिस्थितीनुसार प्लेईंग-11 ठरवली जाईल. तो म्हणाला की प्रत्येक सामन्यात विरोधी संघ, खेळपट्टी आणि हवामान वेगळे असते, त्यामुळे प्लेईंग-11 मध्ये बदल करण्याची गरज वाटत असेल तर ती नक्कीच केली जाईल. रोहित शर्माच्या या विधानानंतर भारतीय क्रिकेटप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत. कारण आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघ लवकर बाहेर पडण्याचं मुख्य कारण म्हणजे प्लेईंग-11 मध्ये सतत होणारे बदल. आता देखील तशीच रणनीती असल्याने क्रिकेटप्रेमी चिंतेत पडले आहेत.

पाकिस्तानविरुद्ध कसा असू शकतो भारतीय संघ?

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

कसं आहे भारताचं वेळापत्रक?

सामना दिवस वेळ
भारत विरुद्ध पाकिस्तान 23 ऑक्टोबर दुपारी 1.30 वाजता
भारत विरुद्ध नेदरलँड 27 ऑक्टोबर दुपारी 12.30 वाजता
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 30 ऑक्टोबर दुपारी 4.30 वाजता
भारत विरुद्ध बांग्लादेश 2 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता
भारत विरुद्ध झिम्बाब्वे 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता

भारतासाठी खेळणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट!

“भारतासाठी खेळणे माझ्यासाठी महत्वाचे असून तो एक सन्मानच आहे, मग तो सामना मी एखादा खेळाडू म्हणून खेळेल किंवा कर्णधार म्हणून,” असंही रोहितनं पुढं म्हटलंय. महत्वाचं म्हणझे, रोहितच्या कारकिर्दीतील हा आठवा टी-20 विश्वचषक आहे. 2007 मध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी रोहित शर्मा भारतीय संघाचा सदस्य होता.  आतापर्यंतचे सगळे टी-20 विश्वचषक खेळणारा रोहित शर्मा एकमेव भारतीय खेळाडू आहे.