Ravindra Jadeja Surgery : भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजा याच्या उजव्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. आशिया चषकातील सामन्यादरम्यान रवींद्र जाडेजाला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे जाडेजानं आशिया चषकातून माघार घेतली होती. आज जाडेजावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. स्वत: रवींद्र जाडेजानं सोशल मीडियावर शस्त्रक्रियाबद्दल माहिती दिली आहे. 


रवींद्र जाडेजानं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती दिली. जाडेजानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'सर्जरी यशस्वी झाली. सपोर्ट करण्यासाठी आणि धीर देण्यासाठी खूप लोक आहेत. बीसीसीआय, सहकारी खेळाडू, फिजिओ, स्टाफ, डॉक्टर आणि चाहते, सर्वांचे आभार... लवकरच पुनरगामन करण्याचा प्रयत्न करेन... तुमच्या सर्वांच्या शुभेच्छासाठी धन्यवाद... '  सुत्रांच्या माहितीनुसार, सर्जरीनंतर रवींद्र जाडेजाला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला जाऊ शकतो. विश्वचषक जवळ आला असताना स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. 


रवींद्र जाडेजाची पोस्ट - 







जाडेजा विश्वचषकाला मुकणार?
टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जाडेजाला उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला मुकावं लागण्याची शक्यता आहे. रवींद्र जाडेजाच्या उजव्या गुडघ्याची दुखापत गंभीर आहे. या दुखापतीमुळं त्याला युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकातून माघार घ्यावी लागली आहे. जाडेजाच्या दुखापतग्रस्त गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर त्याला किमान सहा महिने सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात येऊ शकतो. दरम्यान, जाडेजाच्या अनुपस्थितीत भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. येत्या 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे.


लवकरच टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा
ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. आशिया चषकानंतर भारतीय निवड समिती टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. 


भारताला मोठा धक्का
आशिया चषकादरम्यान रवींद्र जाडेजाचं दुखापतग्रस्त होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र जाडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध हायव्होल्टेज सामन्यात त्यानं भारतासाठी 35 धावांचं महत्वाचं योगदान दिलं होतं. तर, हाँगकाँगविरुद्ध त्यानं चार षटकात 15 धावा देऊन 1 विकेट्स घेतली होती. त्यानंतर आता तो विश्वचषकालाही मुकल्यास भारताला मोठं नुकसान होईल.