India vs Zimbabwe, T20 : भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात असून भारतीय संघाची फलंदाजी नुकतीच पार पडली आहे. चांगली सुरुवात झाल्यानंतरही मधली काही षटकं खास फलंदाजी करु न शकलेल्या भारतानं अखेर सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) फटकेबाजीच्या जोरावर 186 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. भारताकडून सूर्युकमारसह केएल राहुलनंही अर्धशतक ठोकलं आहे. आता 187 धावा करण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ मैदानात उतरणार आहे. 


सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारतानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि राहुल मैदानात आले, पण कर्णधार रोहित 15 धावा करुनच तंबूत परतला. कोहलीही 26 धावा करुन बाद झाला. पण राहुलने आज संयमी फलंदाजी करत 51 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारनं क्रिजवर आल्यापासून फटकेबाजी कायम ठेवली. त्याला पांड्याने 18 धावांची मदत करत एक चांगली भागिदारी उभारली. सामन्यात अवघ्या 25 बॉलमध्ये नाबाद 61 धावा करत सूर्यकुमारने भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली.


...म्हणून विजय महत्त्वाचा


यंदाच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ गुणतालिकेतील कमाल कामगिरीमुळे आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आज बांगलादेशला मात देत पाकिस्तानचा संघही सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानकडे 6 गुण आहेत, पण भारताने आज झिम्बाब्वेला मात दिल्यास भारत 8 गुणांसह सर्वाधिक गुणांनी सेमीफायनलमध्ये पोहोचेल. त्यामुळे सर्वाधिक गुणांनी सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला झिम्बाब्वेला मात देणं गरजेचं आहे. 


बऱ्याच काळानंतर संधी मिळाल्यावरही पंत फेल


भारतीय संघाच्या अंतिम 11 चा विचार करता केवळ एक बदल करण्यात आला आहे. यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंत संघात आला आहे. रोहितने या बदला बद्दल बोलताना पंतने या स्पर्धेत एकही सामना खेळलेला नाही, सराव सामनाही नाही. त्यामुळे त्याला संधी देत असल्याचं म्हटलं. पण पंतला आज फलंदाजी करण्याची संधी मिळाली असूनही तो खास कामगिरी करु शकला नाही. अवघ्या 3 धावा करुन तो तंबूत परतला.


हे देखील पाहा-


Arshdeep Singh Life Story : वडील कॅनडाला पाठवत होते, पण गड्यानं एक वर्ष मागितलं आणि इतिहास घडवला