T20 World Cup 2022 : भारतीय क्रिकेट टीम (Team india) टी-20 विश्वचषकापूर्वी दोन सराव सामने खेळणार असून यातील पहिला सराव सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघ ब्रिस्बेनला पोहोचले असून ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाला मिळणाऱ्या सुविधा पाहता ऑस्ट्रेलियाचा संघ मुद्दाम भारताबरोबर दुजाभाव करत आहे का? असा प्रश्न उभा राहिला आहे. कारण ब्रिस्बेनमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ थांबले असून भारताला यावेळी 4 स्टार हॉटेल मिळालं आहे, तर यजमान ऑस्ट्रेलिया संघ 5 स्टार हॉटेलमध्ये थांबला आहे. रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीतून भारतीय संघ या गोष्टीमुळे नाराज असल्याचंही समोर आलं आहे.
विश्वचषकासारख्या भव्य स्पर्धेवेळी संघांच्या मुक्कामाची व्यवस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी (ICC) आणि स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या देशाच्या क्रिकेट बोर्डाची असते. त्यामुळे यजमान संघ पाहुण्या संघाला अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करेल असा विचार केला जात असून ऑस्ट्रेलियन क्रिकेटने मात्र दुजाभाव करत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत कमी दर्जाचं हॉटेल दिल्याचं दिसून आलं आहे. अनेकांनी या गोष्टीवर नाराज होत ट्वीटही केलं आहे.
कोणत्या शहरांत रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ आमने-सामने
टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, यूएई, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेच्या संघाचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या या आठ संघांनी सुपर 12 साठी पात्रता मिळवली आहे.
हे देखील वाचा-