1983 Players Match Fee : माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 25 जून 1983 लॉर्ड्सच्या मैदानावर इतिहास रचला होता. 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजच्या संघाला नेस्तनाबूत करत पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं होतं. या विजयासह भारतानं वेस्ट इंडिजचं सलग तीन विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरलं होतं. भारतानं मिळवलेल्या या विजयाला 40 वर्ष झालीत तरी त्याच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत. आज बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जातं. मात्र, 1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या शिलेदारांना त्यावेळी किती मानधन मिळायचं? हे वाचल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण सध्या भारतीय क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. विद्यमान भारतीय खेळाडूला लाखो रुपयांचं मानधन मिळत.. पण 1983 विश्वचषक विजेत्या संघाला प्रत्येक सामन्याला फक्त 200 रुपयांचा भत्ता मिळत होता.


भारतीय संघात त्यावेळी कपिल देव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावस्कर, कृष्णामाचारी श्रीकांत, यशपाल शर्मा, संदीप पाटिल, कीर्ति आजाद, रॉजर बिन्नी, मदनलाल, सैय्यद किरमानी, बलविंदर सिंह संधू, दिलीप वेंगसरकर, रवि शास्त्री हे खेळाडू होते तर बिशनसिंग बेदी हे भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि व्यवस्थापकाला तीन दिवसांचा एकूण भत्ता 600 रुपये (प्रति दिवस 200 रुपये) आणि मॅच फीसह 1500 असे एकूण 2100 रुपये देण्यात आले होते. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 



1983 विश्वचषक विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूची स्वतःची वेगळी कथा आहे. काहींनी गोलंदाजी करून काहींनी फलंदाजी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. प्रत्येकाच्या परिश्रमामुळे टीम इंडियाने वेस्ट इंडिजला हरवून इतिहास रचला. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ खूप मजबूत होता आणि त्यांनी दोनदा विश्वचषक जिंकला होता. अशा परिस्थितीत, त्यांचा पराभव करणे ही एक मोठी कामगिरी होती.


भारताला विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव पहिला कर्णधार
भारताचा माजी कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक जिंकलाय. 1983 च्या विश्वचषकात भारतानं चमकदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य संघ वेस्ट इंडीजचा  दबदबा संपवला. भारताला विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव पहिला कर्णधार ठरला. कपिल देवनंतर भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा महेंद्र सिंह धोनी दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. 


2023 च्या विश्वचषकात टीम इंडिया बाजी मारणार?


आज 25 जून, बरोबर 40 वर्षांपूर्वी 25 जून 1983 रोजी इंग्लंडमधील लॉर्डस गॅलरीमध्ये कर्णधार कपिल देवने वन डे क्रिकेटचा विश्वचषक उंचावला होता. त्या विजयाला आज ४० वर्ष पूर्ण झाली. लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर कपिल देवच्या टीम इंडियाने बलाढ्य वेस्ट इंडिजला 43 धावांनी पराभूत केलं होतं. या विजयानंतर भारताचा क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण होण्यास सुरुवात झाली. योगायोगाने यंदाचं 2023 चं वर्ष वन डे विश्वचषकाचं वर्ष आहे. त्यामुळे 1983 च्या कपिल देव आणि 2011 च्या महेंद्रसिंग धोनीच्या टीम नंतर यंदाचा भारतीय संघ या विजयाची पुनरावृत्ती करेल का हे पाहावं लागेल. यंदाच्या विश्वचषकाचं आयोजन भारतात होत आहे