लंडन : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडमधल्या विश्वचषकात पाचवं शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे एकाच विश्वचषकात सर्वाधिक पाच शतकं झळकावण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर जमा झाला आहे.
रोहित शर्माने श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा एकाच विश्वचषकात सर्वाधिक चार शतकांचा विक्रम आता मोडीत काढला आहे. कुमार संगकारानं 2015 सालच्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. रोहितने लीड्समधल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकून संगकाराचा विक्रम इतिहासजमा केला. त्याने 94 चेंडूंत 14 चौकार आणि दोन षटकारांसह 103 धावांची खेळी उभारली.
यंदाच्या विश्वचषकात रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि आज श्रीलंका या 5 संघांविरुद्ध त्याने शतक ठोकले आहे.
रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी उभारली होती. त्यानंतर पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसमोर रोहितने 140 धावांची खेळी रचली. यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 102 धावांची खेळी केली. बांगलादेशसमोर 104 धावा फटकावल्या आणि आजच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 103 धावा केल्या. त्यामुळे रोहितच्या नावावर या विश्वचषकात 544 धावा जमा झाल्या आहेत.
सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
विश्वचषकातील सर्वाधिक शतकांच्य़ा यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर विश्वचषकात सहा शतकं आहेत. त्यामुळे रोहित शर्मा सचिनचा तो विक्रम आपल्या नावावर जमा करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.