लंडन : विश्वचषकाच्या साखळी सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील प्रवेश कठीण बनला आहे. टीम इंडिया इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकेल आणि त्याचा फायदा पाकिस्तानी संघाला होईल, अशी आशा पाकिस्तानी फॅन्सना होती. मात्र भारताच्या पराभवामुळे पाकस्तानी फॅन्स भडकले आहेत आणि सोशल मीडियावर ते आपला राग व्यक्त करत आहेत.



इंग्लंडविरुद्धचा सामना फिक्स असल्याचा आरोप पाकिस्तानी फॅन्सनी केला आहे. तर भारतीय खेळाडूंनी सामन्यात केलेल्या अभिनयासाठी त्यांना ऑस्कर अवॉर्ड दिला पाहिजे, असं एका पाकिस्तानी फॅनने म्हटलं आहे.



तर महेंद्रसिंह धोनीने 2009 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा बदला घेतला आहे. त्यावेळी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने टीम इंडिया उपांत्य फेरीत दाखल होऊ शकली नव्हती, याचा बदला घेतल्याचा आरोप एका पाकिस्तानी फॅनने केला आहे.



इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानची उपांत्य फेरीत दाखल होण्याची आशा धुसर झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानी फॅन्स किती संतापले आहेत, याचा अंदाज सोशल मीडियावर नजर टाकली तर येईल.