लंडन : टीम इंडियाच्या विश्वचषकातील अवे सामन्यासाठी नाईकीनं बनवलेली नवी जर्सी अखेर आज लॉन्च करण्यात आली. टीम इंडियाचे शिलेदार रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात निळ्या भगव्या रंगांची ही जर्सी परिधान करून मैदानात उतरतील.


आयसीसीनं यंदाच्या विश्वचषकात फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे मॅच हा प्रयोग राबवला आहे. त्यानुसार दोन प्रतिस्पर्धी संघांच्या जर्सीचा रंग एकसारखा असेल तर, यजमान संघाला मूळ जर्सी आणि पाहुण्या संघाला पर्यायी रंगाची जर्सी परिधान करावी लागणार आहे.





विश्वचषकाचे यजमान या नात्यानं इंग्लंडसाठी भारताविरुद्धचा सामना हा त्यांच्यासाठी होम मॅच आहे. त्यामुळं इंग्लंड संघ मूळ निळ्या जर्सीतच मैदानात उतरेल. पण भारतासाठी ही अवे मॅच आहे. त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार निळ्या भगव्या जर्सीत खेळताना दिसतील. नवीन जर्सीमध्ये समोरचा भाग हा निळ्या रंगाचा ठेवण्यात आला असून दोन्ही हात आणि पाठीमागचा संपूर्ण भाग भगव्या रंगात ठेवण्यात आला आहे.




भगव्या जर्सीवरून भारतामध्ये राजकारणही सुरु झालं होतं. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांनी या जर्सीला विरोध दर्शवला होता. यामुळे भारतीय संघाच भगवीकरण होत असल्याचा आरोप सपा नेते अबू आझमी यांनी केला होता.