लंडन : विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड यजमान इंग्लंडने रोखली आहे. कालच्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला. 1992 नंतर पहिल्यांदा इंग्लंडने विश्वचषकात भारताचा पराभव केला आहे.


मात्र टीम इंडियाच्या पराभवानंतर संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केदार जाधवच्या जागी रविंद्र जाडेजाचा संघात समावेश करण्याबाबत संघ व्यवस्थापनाने विचार करावा, असा सल्ला दिला आहे.


एका मुलाखतीत बोलताना सचिनने म्हटलं की, "इंग्लडच्या जॉनी बेयरस्टो आणि जेसन रॉय यांनी ज्याप्रकारे भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी केली, त्यावेळी एखादा डावा फिरकी गोलंदाज संघात हवा होता. याचा फायदा टीम इंडियाला झाला असता. केदार जाधव संघात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याच्याजागी रविंद्र जाडेजाही चांगली फलंदाजी करु शकतो. तसेच डाव्या फिरकी गोलंदाजीची कमीही तो भरून काढू शकतो. त्यामुळे केदार जाधवच्या जागी जाडेजाला संघात खेळवलं जाऊ शकतं."


बर्मिंगहॅमच्या लढाईत इंग्लंडने भारतावर 31 धावांनी मात करुन, आठ सामन्यांमधला पाचवा विजय साजरा केला. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 50 षटकांत पाच बाद 306 धावांचीच मजल मारता आली.